संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
श्वासनिदान

माधवनिदान - श्वासनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


श्वासाचे प्रकार .

महोर्ध्वछिन्नतमकक्षुद्रभेदैश्च पञ्चधा ॥

भिद्यते स महाव्याधि : श्वास एको विशेषत : ॥१॥

एकच श्वास ( दमा ) हा महारोग असून त्याचे महाश्वास , ऊर्ध्वश्वास , छिन्नश्वास , तमकश्वास आणि क्षुद्रश्वास असे पांच प्रकार आहेत .

श्वासाचें पूर्वरूप .

प्राग्रूपं तस्य ह्र्त्पीडा शूलमाध्मानमेव च ॥

आनाहो वक्त्रवैरस्यं शङ्खनिस्तोद एव च ॥२॥

श्वास उत्पन्न होण्याच्या पूर्वी रोग्याच्या ठायी छातीत कळ , शूल , पोट फुगणे व ताणणे , आनाह ( शूलयुक्त पोट फुगणे ), तोंडास अरुचि आणि कानशिलांत टोंचल्यासारख्या वेदना ही लक्षणे उत्पन्न होतात .

श्वासाची संप्राप्ति .

यदा . स्त्रोतांसि संरुध्य मारुत : कफपूर्वक : ॥

विष्वग्व्रजति संरुद्धस्तदा श्वासान्‌ करोति स : ॥३॥

जेव्हां रोग्याच्या शरीरांत प्रकोप पावलेला वायु कफमिभित होऊन स्रोतसांचा ( प्राण , अन्न व उदक वाहविणार्‍या नाडयांचा ) मार्ग रोध करून सर्वत्र बाहेर पडू लागतो तेव्हां तो त्याच्या ठायीं श्वासरोग उत्पन्न करतो .

महाश्वासाचीं लक्षणें .

उद्भयमानवातो य : शब्दवद्‌ दुःखितो नर : ॥

उच्चै : श्वसिति संरूद्धो मत्तर्षभ इवानिशम्‌ ॥४॥

प्रनष्टज्ञानविज्ञानस्तथाविभ्रान्तलोचन : ॥

विवृताक्षाननो बद्धमूत्रवर्चा विशीर्णवाक्‌ ॥५॥

दीन : प्रश्वसितं चास्य दूराद्विज्ञायते भृशम्‌ ॥

महाश्वासोपसृष्टश्च शीघ्रमेव विपद्यते ॥६॥

हा झालेल्या रोग्याचा वायू वर ओढला जाऊन तो दुःखित होत्साता एखाद्या , रागावलेल्या व माजलेल्या बैलाप्रमाणे अहोरात्र उंच व शब्दयुक्त असा श्वास टाकतो , तसेच त्याचे ज्ञान वगैरे नष्ट होणे , डोळे चंचल होणे व ताणले जाणे , तोंड वासणे , मलमूत्राचा अवरोध होणे , विशीर्णवाक् म्हणजे आवाज फुटीर किरकिरा ( अथवा फारच हलके बोलता येणे ) आणि अत्यंत दीनपणा येणे ही लक्षणे त्याच्या ठायी उत्पन्न होतात . अशा प्रकारचा हा महाश्वास दुरूनच ओळखता येतो . श्वासाच्या सर्व प्रकारांपैकी महाश्वास हा तत्काळ प्राणाचा नाश करणारा आहे .

उर्ध्वश्वासाची लक्षणें .

ऊर्ध्वं श्वसिति यो दीर्घं न च प्रत्याहरत्यध : ॥

श्लेष्मावृतमुखस्नोता : कृद्धगन्धवहार्दित : ॥७॥

ऊर्ध्वद्दष्टिर्विपश्यंश्च विभ्रान्ताक्ष इतस्तत : ॥

प्रमुह्यन्वेदनार्तश्च शुष्कास्योऽरतिपीडित : ॥८॥

ऊर्ध्वश्वासे प्रकुपिते ह्यध : श्वासो निरुध्यते ॥

मुह्यतताग्यस्ताश्चोर्ध्वं श्वासस्तस्यैव हन्त्यसून्‌ ॥९॥

ऊर्ध्व श्वास झालेला रोगी पुष्कळ वेळ श्वास वर ओढून घेतो व लवकर खाली सोडीत नाही ; त्याचे तोंड आणि स्त्रोतसे ( नाडया ) कफाने दाटतात व प्रकोप पावलेल्या वायूपासून त्याच्या शरीराच्या ठायी वेदना होतात . तसेंच तो डोळे वर करून चंचल द्दष्टीने भ्रांतिष्टासारखाच चहूकडे पाहतो व याशिवाय तोंडास कोरड , मूर्च्छा , वेदना व मनास अस्वस्थता ही लक्षणे त्याच्या ठायी द्दष्टीस पदतात . अशा प्रकारचा हा ऊर्ध्वश्वास प्रबळ झला असतां खालचा श्वास बंद होतो ( म्हणजे वायु हृदयांत कोंडून राहिल्यामुळे तो खाली उतरत नाहीं .) व रोग्याच्या ठायी मूर्च्छा व ग्लनि ह्या उत्पन्न होऊन त्याचा प्राण जातो .

छिन्नश्वासाचीं लक्षणें .

यस्तु श्वसिति विच्छिन्नं सर्वप्राणेन पीडित : ॥

न वा श्वसिति दु : खार्तो मर्मच्छेदरुगर्दित : ॥१०॥

आनाहस्वेदमूर्च्छार्तो दह्यमानेन बस्तिना ॥

विप्लुताक्ष : परिक्षीण : श्वसन्‌ रक्तैकलोचन : ॥११॥

विचेता : परिशुष्कास्यो विवर्ण : प्रलपन्नर : ॥

छिन्नश्वासेन विच्छिन्न : स शीघ्रं विजहात्यसून्‌ ॥१२॥

छिन्नश्वास झालेल्या रोग्याची लक्षणे :--- रोगी राहून राहून आपल्या सर्व शक्तीचा उपयोग करून श्वासोच्छवास करितो किंवा तो अगदी बंद झाल्यासारखा दिसतो ; व त्यावेळी ह्रदयावर कुर्‍हाडीचा प्रहार केल्याप्रमाणे वेदना होऊन तो घाबरा होतो . शिवाय त्याचे पोट फुगते . घाम येतो , बस्तीत दाह होतो . मूर्च्छा येते . डोळे आंसवांनी भरून जातात व वारंवार श्वास टाकल्यामुळे रक्तासारखे लाल होतात , तोंडास कोरड पडते . अंगाचा वर्ण बदलतो व अत्यंत क्षीणता येते , चित्त उद्विग्न होते , अशक्तपणा येतो व तो बडबड करतो . या प्रकारच्या लक्षणांचा हा छिन्नश्वास झालेला रोगी लौकरच प्राणत्याग करतो .

तमक श्वासाचीं लक्षणें .

प्रतिलोमं यदा वायु : स्त्रोतांसि प्रतिपद्यते ॥

ग्रीवां शिरश्च सङगृह्य श्लेष्माणं समुदीर्य च ॥१३॥

करोति पीनसं तेन रूद्धो घुर्घुरकं तथा ॥

अतीव तीव्रवेगेन श्वासं प्राणप्रपीडकम्‌ ॥१४॥

प्रताम्यति स वेगेन त्रस्यते सन्निरुध्यते ॥

प्रमोहं कासमानश्च स गच्छति मुहुर्मुहु : ॥१५॥

श्लेष्मणा मुच्यमानेन भृशं भवति दुढखित : ॥

तस्यैव च विमोक्षान्ते मुहूर्तं लभते सुखम्‌ ॥१६॥

तथास्योद्‌ध्वंसते कण्ठ : कृच्छ्राच्छक्नोति भाषितुम्‌ ॥

न चापि लक्षते निद्रां शयान : श्वासपीडित : ॥१७॥

पार्श्वे तस्यावगृण्हाति शयानस्य समीरण : ॥

आसीनो लभते सौख्यमुष्णं चैवाभिनन्दति ॥१८॥

उच्छूनाक्षो ललाटेन स्विद्यता भृशमार्तिमान्‌ ॥

विशुष्कास्यो मुहु : श्वासो मुहुश्वैवावधम्यते ॥१९॥

मेघाम्बुशीतप्राग्वातै : श्लेष्मलैश्व विवर्धते ॥

स याप्यस्तमकश्वास : साध्यो वा स्यान्नवोत्थित : ॥२०॥

रोग्याच्या शरीरातील प्रकोप पावलेला वायु उलट गतीने त्याची मान व डोके जखडून टाकतो व कफाशी मिश्रित होऊन वरच्या स्रोतसांत ( नाडयांमध्ये ) शिरतो व त्या ( कफा ) मुळे त्यांच्या ( नाडयांच्या ) मार्गाचा रोध करतो व त्याच्या ठायी पडसे , गळयांत होणारा घुरघुर शब्द आणि अत्यंत जोराचा ह्रदयास पीडा करणारा असा श्वास उत्पन्न करतो ; हाच तमक श्वास होय . हा झाला . असता रोगी वेशुद्ध पडतो . त्रासतो , निश्चेष्ट होतो व खोकतांना वारंवार मूर्च्छा पावतो . तसेच जेव्हां त्याचा कफ सुटत असतो तेव्हां त्यास फार आयास होतात व सुटला म्हणजे दोन घटका सुख वाटते ; तरी त्याचा गळा खाजत असतो व फारच कष्टाने तो बोलू शकतो . आणखी या श्वासामुळे तो निजला असता वायूने वरगडया धरतात व त्यास झोप येत नाही , डोळे सुजतात . शरीराच्या ठायी अत्यंत वेदना होतात . तोंडास कोरड पडते . वारंवार श्वास उत्पन्न होतो . आणि वारंवार तो आपले अंग डोलवीत असतो ; त्यास बसले असतां बरे वाटते व उष्ण पदार्थाचे सेवन झाले असतां सुख वाटते , अशा अनेक प्रकारचीं लक्षणें उत्पन्न करणारा हा तमक श्वास आहे . हा मेव , पाऊस , थंडी व पूर्वेकडील वारा व कफकारक पदार्थ यांच्या सेवानाने प्रबळ होतो . नवीन उत्पन्न होतांक्षणी यावर उपाय केले तर हा साध्य होतो ; नाहीपेक्षा याप्य ( औषध घ्यावें तोंपर्यंत बरा असणारा व ते सोडतांच पुन : उत्पन्न होणारा असा ) होऊन राहतो .

प्रतमक .

ज्वरमूर्च्छापरीतस्य विद्यात्प्रतमकं तु तम्‌ ॥

उदावर्तरजोजीर्णक्लिन्नकायनिरोधज : ॥२१॥

तमसा वर्धतेऽत्यर्थं शीतैश्चाशु प्रशाम्यति ॥

मज्जतस्तप्रसीवास्य विद्यात्प्रतमकं तु तम्‌ ॥२२॥

वर सांगितलेल्या तमकश्वासाचाच एक निराळा प्रकार आहे , त्यास प्रतमक श्वास म्हणतात . तमक श्वासांत ज्वर आणि मूर्च्छा ही लक्षणें उत्पन्न झाली म्हणजे प्रतमक श्वास होतो ; किंवा शरीरांत वाढलेला जलांश , धूळ , अजीर्ण व मलमूत्रादिकांच्या वेगाचा अवरोध या कारणांमुळे उत्पन्न होतो , व तो झाला असता रोग्यास अंधारांत बुडून गेल्यासारखे वाटते . हा प्रतमक श्वास अंधारात बसल्याने अत्यंत वाढणारा व शीतकारक उपचारांनी त्वरित शमणारा आहे असे जाणावे .

क्षुद्र श्वासाचीं लक्षणें .

रूक्षायासोद्भव : कोष्ठे क्षुद्रो वातमुदीरयेत्‌ ॥

क्षुद्रश्वासो न सोऽत्यर्थं दु : खेनाङप्रबाधक : ॥२३॥

हिनस्ति न स गात्राणि न च दुःखो यथेतरे ॥

न च भोजनपानानां निरुणद्धयुचितां गतिम्‌ ॥२४॥

नेन्द्रियाणां व्यथां चापि काञ्चिदापादयेदुजम्‌ ॥

स सध्या उक्त :---

रुक्ष पदार्थांचे सेवन आणि श्रम हे केल्यापासून जो श्वास उत्पन्न होतो तो क्षुद्र श्वास जाणावा , हा झाल्यामुळे रोग्याला मोठेसे दु : ख होत नाही व शरीरालहि तो काही विशेष बाधा करीत नाही . हा वायूला वर नेतो , पण ऊर्ध्वश्वासादिक इतर श्वास तसे करून ज्या वेदना देतात तशा हा देत नाही ; इतकेच नाही , तर खाण्यापिण्याच्या योग्य मार्गाचा रोधहि हा करीत नाही . तसेच याच्यामुळे कोणत्याही इंद्रियास कांही व्यथा जडत नाही व त्याच्या ठायी कसलाहि विकार उत्पन्न होत नाही . हा क्षुद्र श्वास त्याच्या निरुपद्रविक लक्षणांवरून साध्य म्हणून सांगितला आहे .

बलिन : सर्वे चाव्यक्तलक्षणा : ॥

क्षुद्र : साध्यस्तमस्तेषां तमक : कृच्छ्र उच्यते ॥२५॥

त्रय : श्वासा न सिद्धयन्ति तमको दुर्बुलस्य च ॥

सशक्त पुरुषास झालेलेअ महाश्वासादिक पांचहि श्वास जर अस्पष्ट लक्षणांचे ( अथवा नुकतेच झालेले ) असतील तर ते सर्व साध्य होतात . एरवी क्षुद्र श्वास लौकर साध्य होणारा , तमक श्वास कष्टसाध्य आणि बाकीचे तीन असाध्य असा नियं समजावा . रोगी अशक्त असला तर त्यास झालेला तमक श्वासहे प्राणघातक समजवा .

कांम प्राणहरा रोगा बहवो न तु ते तथा ॥

यथा श्वासश्च हिक्का च हरत : प्राणमाशु वै ॥२६॥

आतां या रोगनिदानाच्या शेवटी इतकेच सांगावयाचे की रोग्याचा प्राण हरण करणारे ( ज्वर वगैरे ) अनेक रोग आहेत हे जरी खरे आहे ; तरी हिक्का आणि श्वास हे रोग जसा त्याचा त्वरित प्राण घेतात तसे दुसरे घेत नाहीत . ( यासाठी हे रोग फार भयंकर समजून ते उत्पन्न होतांक्षणी त्यावर उपचार करण्याविषयी रोग्याने हयगय करू नये .)

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP