भगंदराचे प्रकार .
गुदस्य द्वयङ्गुले क्षेत्रे पार्श्वत : पिडिकाऽर्तिकृत् ॥
भिन्न भगन्दरो ज्ञेय : स च पञ्चविधो मत : ॥१॥
रोग्यास गुदद्वारापासून दोन बोटांवरच्या बाजूच्या जागेत एक पुळी उत्पन्न होते व तिला अतिशय ठणका असतो . हीच पुळी फुटुन त्या ठिकाणी जे छिद उद्भवते त्यास भगंदर रोग असे म्हणतात . याचे तिन्ही दोषांपासून पृथक् पृथक् होणारे तीन , तिन्ही दोष मिळून होणारा सान्निपातिक एक व क्षतजन्य एक असे पाच प्रकार आहेत .
भगंदराचीं पूर्वरूपें .
कटीकपालनिस्तोददाहकण्डूरुजादय : ॥
भवन्ति पूर्वरूपाणि भविष्यति भगन्दरे ॥
भगंदर होण्याच्या पूर्वी कंबरेच्या कपालास्थीला टोचणी लागते , दाह होतो , कंड सुटते व ठणका लागतो .
वातजन्य भगंदराचीं कारणें व लक्षणें
कषायरूक्षैस्त्वतिकोपितोऽनिल -
स्त्वपानदेशे पिटिकां करोति याम् ॥२॥
उपेक्षणात् पाकमुपैति दारूणं
रुजा च भिन्नारुणफेनवाहिनी ॥
तत्रागमो मूत्रपुरीषरेतसां
व्रणैरनेकै : शतपोनकं वदेत् ॥३॥
रुक्ष व तुरट पदार्थांच्या भक्षणामुळे अत्यंत कुपित झालेला वायु गुदद्वाराच्या ( वर सांगितलेल्या ) जागी जी पुळी उत्पन्न करतो तिजविषयी उपचाराची हयगय झाली असता ती पुळी पिकून फुटते व त्या ( पुळी फुटलेल्या ) जागी ठणका लागतो व तीतून तांबून व फेसयुक्त असा पू वाहतो . तसेच चाळणीसारखी त्या जागी अनेक छिदे पडून त्यांतून मल , मूत्र व रेत यांचा स्राव होऊ लागतो . याप्रकारच्या लक्षणांनी युक्त आसलेले हे वातजन्य भगंदर जाणावे ; यास चाळणोसारखी छिदे असतात म्हणून शतपोनक भगंदर असेहि म्हणतात .
पित्तजन्य भगंदराचीं लक्षणें .
प्रकोपनै : पित्तमतिप्रकोपितं
करोति रक्तां पिटकां गुदाश्रिताम् ॥
तदाऽऽशुपाकाऽहिमपूतिवाहिनीं
भगन्दरं तूष्ट्रशिरोधरं वदेत् ॥४॥
पित्तकारक पदार्थाच्या सेवनामुळे अति कुपित झालेले पित्त गुदद्वाराच्या शेजारी लाला पुळी उत्पन्न करते व ही पुळी लौकर पिकून फुटली असता तिच्यातून कढत पू वाहू लागतो . या लक्षणाचे हे पित्तजन्य भगंदर होय . यातील पुळी उंटाच्या मानेसारखी असते म्हणून यास उष्ट्रशिरोधर असे दुसरे नाव आहे .
कफजन्य भगंदर .
कण्डूयनो घनस्रावी कठिनो मन्दवेदन : ॥
श्वेतावभास : कफंज : परिस्नावी भगन्दर : ॥५॥
ज्या भगंदरातील ( कफापासून उद्भवलेली ) पुळी पांढरी , कठीण व कमी ठणका असलेली अशी असते व ती फुटली असता ( त्या जागी ) कंड सुटते व घट्ट पू कडू लागतो त्यास कफजन्य परिस्रावी भगंदर म्हणावे .
त्रिदोषजन्य भगंदर .
बहुवर्णरूजास्नावा : पिटिका गोस्तनोपम : ॥
शम्बूकावर्तवन्नाडी शम्बूकावर्तको मत : ॥६॥
त्रिदोषजन्य भगंदरात गाईच्या स्तनाच्या आकाराच्या अनेक पुळया उद्भवतात : त्यांचे रंग , स्राव व वेदना यांचेही अनेक प्रकार असतात . या पुळया फुटून पडणारी छिद्रे शंखाच्या भोवर्याप्रमाणे असल्यामुळे या भगंदरास शंबुकावर्त भगंदर असे नाव दिले आहे .
क्षतजन्य भगंदर .
क्षताद्नति : पायुगता विवर्धते हापेक्षणात्स्यु : कृमयो विदार्य ते ॥
प्रकृर्वते मार्गमनेकधा मुखैर्व्रणैस्तदुन्मार्गि भगन्दरं वदेत् ॥७॥
गुदद्वाराजवळ जखम होऊन अथवा काटा वगैरे टोचून पडलेल्या क्षताची उपेक्षा केली असता ते क्षत चरत चरत गुदद्वारापर्यत जाते व मग त्यात किडे पडले असता ते किडे त्यास अनेक तोंडें पाडतात . या प्रकारच्या क्षतपासून झालेल्या भगंदरास उन्मार्गी भगंदर असे म्हणतात .
भगंदराची साध्यासाध्य लक्षणें .
घोरा : सधयितुं दुःखा सर्व एव भगन्दरा : ॥
तेध्वसाध्यस्त्रिदोषोत्थ : क्षतजश्च विशेषत : ॥८॥
वातमूत्रपुरीषाणि कृमय : शुक्रमेव च ॥
भगन्दरात्प्रस्नवन्ति नाशयन्ति तमातुरम् ॥
सर्व प्रकारचे भगंदर रोग दुःसाध्य तर खरेच : पण त्यात त्रिदोषजन्य व विशेषत : क्षतजन्य ( भगंदररोग ) हे पूर्ण असाध्य जाणावे . तसेच ज्या भगंदरातून वायु , मल , मूत्र , शुक्र व कृमी हे बाहेर पडतात त्याने रोग्याचा शेवट होणार हेही लक्षात ठेवावे .