विदाहि हिक्का व श्वास होण्याचीं कारणें .
गुरूविष्टाम्भिरूक्षाभिष्यन्दिभोजनै : ॥
शीतपानाशनस्नानरजोधूमातपानिलै : ॥१॥
व्यायामकर्मभाराध्ववेगघातापतर्पणै : ॥
हिक्का स्वासश्च कासश्च नृणां समुपजायते ॥२॥
भोजन करितांना पोट फुगविणारे , जड , रूक्ष , दाह उत्पन्न करणारे , स्राव फार निर्माण करणारे - आणणारे व थंड असे पदार्थ खाल्ले असतां , थंड पाणी प्यालें असतां , व त्यानें स्नान केले असतां , नाकातोंडात धूल गेली असतां ; धूर , ऊन , वारा घेतला असतां , मोठे ओझे उचलले असतां , उपवास केला असतां फार श्रम व पुष्कळ मार्गक्रमण केले असतां आणि मलमूत्रादिकांचा वेग दाबूंन धरला असतां मनुष्याच्या ठायी हिक्का ( उचकी ), श्वास ( दमा ) व कास ( खोकला ) हे उत्पन्ना होतात .
हिक्केचें स्वरूप .
मुहुर्मुहुर्वायुरुदेति सस्वनो
यकृत्प्लिहान्त्राणि मुखादिवाक्षिपन् ॥
सघोषवान्नाशु हिनरत्यसून्यत -
स्ततस्तु हिक्केत्यभिधीयते बुधै : ॥३॥
ज्यांत प्राणवायु ( कंठस्थ उदानवायूसह ) हिगहिग असा शब्द करीत काळीब , प्लीहा आणि आंतडी हीं तोंडांतून ओढूनच काढतो कीं काय असा वर येतो व त्यामूळें रोग्याचा प्राण जातो त्या रोगास वैद्यलोक हिक्का ( उचकी ) ही संज्ञा देतात .
हिक्केचें पूर्वरूप .
कण्ठोरसोर्गुरुत्वं च वदनस्य कषायता ॥
हिक्कानां पूर्वरूपाणि कुक्षेराटोप एव च ॥४॥
गळा आणि ऊर ही जड होणे , तोंड तुरट होणे आणि पोटाला फुगवटी येणे या प्रकारची हिक्केचीं पूर्वरूपे जाणावी .
हिक्केचे भेद .
अन्नजां यमलां क्षुद्रां गम्भीरां महतीं तथा ॥
वायु : कफेनानुगत : पञ्च हिक्का : करोति हि ॥५॥
प्रकुपित वायु कफमिश्रित होऊन अन्नजा , यमला , क्षुद्रा , गंभीरा व महती अशी पांच प्रकारची हिक्का निर्माण करतो .
अन्नजा ,
पानान्नैरतिसम्भुक्तै : सहसा पीडितोऽनिल : ॥
हिक्कयत्यूर्ध्वगो भूत्वा तां विद्यादन्नजां भिषक् ॥६॥
पाणी व अन्न हे पुष्कळ सेवन केल्यामुळे अकस्मात् प्रकोप पावलेला वायु ऊर्ध्वमार्गाने जी उचकी उत्पन्न करतो तिला अन्नजा असे वैद्य म्हणतात .
यमला .
चिरेण यमलैर्वेगैर्या हिक्का सम्प्रवर्तते ॥
कम्पयन्ती शिरो ग्रीवां यमलां तां विनिर्दिशेत् ॥७॥
जी उचकी पुष्कळ वेळाने एकदाम दोनदां आलेली व डोके आणि मान यांच्या टायी कंप उत्पन्न करणारी अशी असते तिला यमला म्हणतात .
क्षुद्रा .
प्रकृष्टकालैर्या वेगैर्मन्दै : समाभिवर्तते ॥
क्षुद्रिकानाम सा हिक्का जत्रुमूलात्प्रधावति ॥८॥
जत्रू ( छातीच्या मधल्या हाडापासून ) उत्पन्न होणारी , फार वेळाने येणारी व जोर अगदी थोडा करणारी अशी जी उचकी असते तिला क्षुद्रा म्हणतात .
गंभीरा .
नाभिप्रवृत्ता या हिक्का घोरा गम्भीरनादिनी ॥
अनेकोपद्रववती गम्भीरा नाम सा स्मृता ॥९॥
नाभीपासून उत्पन्न झालेली , मोठा शब्द करणारी , ( व तृषा , ज्वर वगैरे ) अनेक उपद्रव उत्पन्न करणारी अशी जी उचकी तिला गंभीरा असे नाव आहे .
महति .
मर्माण्युत्पीडयन्तीव सततं या प्रवर्तते ॥
महाहिक्केति सा ज्ञेया सर्वगात्रप्रकाम्पिनी ॥१०॥
( नाभि , बस्ति वगैरे ) मर्मस्थानांच्या ठायीं सर्वकाळ वेदना उत्पन्न करणारी व सर्व गात्रांस कंप आणणारी जी उचकी तिला महती अशी संज्ञा द्यावी .
हिक्कांचीं असाध्य लक्षणें .
आयम्यते हिक्कतो यस्य देहो ॥
द्दष्टिश्चोर्ध्वं ताम्यते यस्य नित्यम् ॥
क्षीणोऽन्नद्विद क्षौति यश्चातिमात्रं
तौ द्वौ चान्त्यौ वर्जयेद्धिक्कमानौ ॥११॥
अतिसञ्चितदोषस्य भक्तच्छेदकृशस्य च ॥
व्याधिभि : क्षीणदेहस्य वृद्धस्यातिव्यवायिन : ॥१२॥
आसां या सा समुत्पन्ना हिक्का हन्त्याशु जीवितम् ॥
शरीर ताणल्यासारखे होणे , द्दष्टि उर्ध्व होणे , मूर्च्छा येणे व तसेच क्षीणत्व , अन्नद्वेष आणि वारंवार शिंका येणे ही लक्षणे हिक्कारोगांत ज्या रोग्याच्या टायीं उत्पन्न होतात तो रोगी आणि ज्यास गंभीरा किंवा महती हिक्का झाली आहे असा रोगी हे दोघेहि असाध्य जाणून वैद्याने सोडावे . त्याचप्रमाणे शरीराचे ठायीं पुष्कळ दोष सांचलेला , अन्न तुटल्यामुळे वाळलेला , अत्यंत स्त्रीसंभोग करणारा , वृद्ध व अनेक रोगांनी क्षीण झालेला अशा रोग्यास जर उचकी उत्पन्न झाली तर ती त्याचा प्राणनाश करणारी समजावी .
यमिका .
यमिका च प्रलापार्तिमोहतृष्णासमन्विता ॥१३॥
अक्षीणश्चाप्यदीनश्च स्थिरधात्विन्द्रियश्च य : ॥
तस्य साधयितुं शक्या यपिका हन्त्यतोऽन्यथा ॥१४॥
वर सांगितलेल्या उचकीच्या पांच प्रकारांखेरीज यमिका म्हणून जी निराळया प्रकराची उचकी आहे ती रोग्याच्या ठायी बडबड , शूल , तृष व मूर्च्छा ही लक्षणे उत्पन्न करून त्याचा प्राणनाश करते . रोगी शशक्त , चित्तास उत्साह असलेला , धातुपुष्ट व इंद्रिये मुद्दढ असलेला असा असला तर ती साध्य होते ; आणि या लक्षणांच्या उलट प्रकारचा ( म्हणजे क्षीण , चित्तास औदासीन्य आलेला , धातुक्षय झालेला व इंद्रियांचे बल गेलेला ) असला तर ही यमिका असाध्य असते .