संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
बालरोगनिदान

माधवनिदान - बालरोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


लहान मुलांचे प्रकार

त्रिविध : कथितो बाल : क्षीरान्नोभयवर्तन : ॥

स्वास्थ्यं ताभ्यामदुष्टाभ्यां रोगसंभव : ॥१॥

लहान मुले तीन प्रकारची असतात ; एक नुसते दूध पिणारी ; एक नुसते अन्न खाणरी ; एक दोन्ही प्रकार ( अन्न खाणे व दूध पिणे ) सेवन करणारी ; तेव्हा जर दूध व अन्न ही त्यांस शुद्ध मिळाली तर ती निरोगी राहतात ; पण ती दुष्ट झालेली त्यानी सेवन केली तर लागलीच त्यांस पुढे सांगितलेले विकार जडतात .

दुधामुळे मुलांना होणारे विकार .

वातदुष्टं शिशु : स्तन्यं पिबन्‌ वातगदातुर : ॥

क्षामस्वर : कृशाङ्ग : स्यात्‌ बंद्धविण्मूत्रमारुत : ॥२॥

स्विन्नो भिन्नोमलो बाल : कामलापित्तरोगवान‌ ॥

तृष्णालुरुष्णसर्वाङ्ग : पित्तदुष्टं पय : पिबन्‌ ॥३॥

कफदुष्टं पिबन्‌ क्षीरं लालालु : श्लेष्मरोगवान्‌ ॥

निद्रार्दितो जड : शून : शुक्लाक्षश्चछर्दन : शिशु : ॥४॥

वातदुष्ट दूध मुले प्यायली असता त्यांस मलम्‌त्र व अपान वायु यांचा अवरोघ होणे , अंगी कृशपणा जडणे व आवाज खोल जाणे वगैरे वातजन्य विकार होतात . पित्तदुष्ट दूध प्यायली असता , कावीळ होणे , घाम येणे , मळ पातळ होणे व शोश पडणे , सर्वांग गरम असणे वगैरे पित्तजन्य विकारांनी ती पिडा पावतात , आणि कफदुष्ट दुग्धसेवनाने लाळ वाहणे , झोप येणे , अंग जड होणे , डोळयांच्या ठिकाणी फिकटपणा येणे व सूज उद्भवणे हे व अन्य कफजन्य विकार त्यांच्या अंगी जडतात .

मुलांस होणारे अंतर्गत विकार व त्यांची परीक्षा .

शिशोस्तीव्रामतीव्रां च रोदनाल्लक्षयद्रुजम्‌ ॥

स यं स्पृशेदभृशं देशं यत्र च स्पर्शनाक्षम : ॥५॥

तत्र विद्याद्रजं मूर्ती रूजं चाक्षिनिमीलनात्‌ ॥

कोष्ठे विबन्धवमथुस्तनदंशान्त्रकूजनै : ॥६॥

आध्मानपृष्ठनमनजठरोन्नमनैरपि ॥

बस्तौ गुह्ये च विण्मूत्रसंगत्रासदिगीक्षणै : ॥७॥

स्नोतांस्पङ्गानि सन्धींश्च पश्येद्यत्नान्मुहु र्मुहु : ॥

मुलांना होणारे विकार त्यांस सांगता येत नसल्यामुळें जाणण्याचे काम मोठे कठीण असते . यासाठी माधवाचार्यांनी त्याविषयीवी सागितलेली लक्षणे नीट लक्षांत ठेवावी .

मुलाला थोडी पीडा असेल तर ते थोडे रडते व फार असेल तर फार रडते ; तसेच ते ज्या जागी वारंवार हात लावते अथवा ज्या जागी दुसर्‍यांनी हात लावला असता रडते त्या जागी त्या त्यास काही तरी झाले आहे असे समजावे . आणखी मुलाचे डोके दुखत असले तर ते डोळे मिटते . त्याच्या कोठयांत काही तरी विकार झाला असला तर त्यास मलावरोव होतो . त्याचे पोट फुगते व गुरगुरते , आत बाहेर प्राठ वाकवते , त्यास ओकारी होते व ते दूध पिताना आईचा स्तन चावते . त्याचप्रमाणे त्याच्या बस्तीत अथवा गुहास्थानी दुखते तेव्हा त्यास मलमूत्रांचा अवरोव होऊन ते दवकते व चहुकडे पाहते . हे प्रकात वैद्याने नीट पाहून मग योग्य ते त्यास औषध द्यावे व त्या मुलाची स्त्रोतसे ( तोंड , डोळे वगैरे द्वारे ), अवयव ( हातपाय वगैरे ) व सांघे हे वारंवार लक्षपूर्वक पाहावे .

कुकूणक अथवा बाळखुपर्‍या .

कुकूणक : क्षीरदोषाच्छिशूनामेव वर्त्मनि ॥

जायते तेन नेत्रं च कण्डूरं च स्नवेन्मुहु : ॥८॥

शिशु : अ कुर्याल्ललाटाक्षिकूटनासाविघर्षणम्‌‍ ॥

शक्तो नार्कप्रभां द्रष्टुं न वर्त्मेन्मीलनक्षम : ॥९॥

दुषित दुग्ध प्याल्याने मुलास कुकूणक अथवा बाळखुपन्या हा विकार ( डोळयांस ) होतो . यात डोळयांना खाज सुटते , गळ लागते , ते खुपतात . तसेच मुलस उजेडाकडे पाहवत नाही व डोळे उघडता येत नाहीत . ( डोळे खुपू लागले असता ) ते कपाळ , नाक व डोळे यांस सारखे चोळीत असते .

परिगर्भिकाचीं लक्षणें .

मातु : कुमारो गर्भिण्या ; स्तन्यं प्राय : पिबन्नपि ॥

कासाग्निसादवमथुतन्द्राकाश्यीरुचिभ्रमै : ॥१०॥

युज्यते कोष्ठवृद्धया च तमाहु : परिगर्भिकम्‌ ॥

रोगं परिभवाख्यं च दद्यात्तत्राग्निदीपनम्‌ ॥११॥

गरोदर आईचे दूध मुल प्याले असता त्यास पारिगर्भिक विकार होतो , यास आपल्यांत मुल अवथणे असे म्हणतात , खोकला , अग्निमांश , झांपड , अरुचि व भ्रम ही लक्षणे मुलाचे ठिकाणी या विकारात होऊन त्याचे पोट मात्र मोठे व बाकी सर्व शरीर रोड होते . वैद्याने अशा प्रकारे मूल अवथणले असता त्यास भूक लागणारे औषध द्यावे म्हणजे ते लौकरच पूर्व स्थितीवर येते .

तालुकंटक अथवा टाळू पडणे .

तालूमांसे कफ : क्रुद्धा : कुरुते तालुकण्टकम्‌ ॥

तेन तालुप्रदेशस्य निम्नता मूर्घ्नि जायते ॥

तालुपात : स्तनद्वेष : कृच्छ्रात्पानं शकृद्‌द्रवम्‌ ॥

तृडक्षिकण्ठास्यरूजा ग्रीवादुर्धरता वमि : ॥१३॥

लहान मुलांच्या टाळुच्या मांसात कफक्रोप झाला असता तालुकंटक अथवा टाळू पडणे हा विकार होतो . यात मुलाच्या टाळुला खळगा पडतो व ती खाली लोंबते ; मुल आईच्या अंगावर दूध पीत नाही ; प्याले तर मोठया कष्टाने पिते . ते दूध लागलीच ओकून पडते , तसेच त्यास मळ पातळ होतो , तहान लागते , मान सावरता येत नाही वतोंड , घसा आणि डोळे यांच्या ठिकाणी दुखते .

महापद्म विसर्पाचीं लक्षणें .

विसर्पस्तु शिशो : प्राणनाशनो बस्तिशीर्षज : ॥

पद्मवर्णो महापद्मरोगो दोषत्रयोद्भव : ॥१४॥

शङ्खाभ्यां हृदयं याति हृदयाद्वा गुदं व्रजेत्‌ ॥१५॥

त्रिदोषप्रकोपापासून लहान मुलाचे डोके अथवा बस्ति यांच्या ठिकाणी महापद्म विसर्परोग होतो . हा आपल्यांत धावरे म्हणून प्रसिद्ध आहे . हा रोग कानशिलावर उत्पन्न होऊन मग पसरत पसरत उरावर येतो , अथवा उरावरच प्रथम उद्भवून मुलाच्या गुदद्वारापर्यंत जातो ; तसेच हा वर्णाने कमळाच्या पानाप्रमाणे लाल असतो व हटकून मुलाचा प्राण घेतो .

क्षुद्ररोगे च कथिते त्वजगल्लयहिपूतने ॥

ज्वराद्या व्याधय : सर्वे महतां ये पुरेरिता : ॥

बालदेहेऽपि ते तद्वद्विज्ञेया : कुशलै : सदा ॥१६॥

येथपर्यंत सांगितलेल्या रोगांशिवाय मागे क्षुद्ररोगनिदानात सांगितलेले अजगल्ली , अहिपूतना हे रोग मुलांस होतात ; व त्याखेरीज मोठया मनुष्यास होणारे ज्वरादि सर्व रोगही लहान मुलांस होत असतात , हे सूजांनी लक्षात ठेवावे .

मुलांस होणार्‍या अंगरोगांविषयी आतापर्यंत सांगितले . आता त्यांस पुढे सांगितलेल्या स्कंदादि नवग्रहापासून ज्या पीडा होतात त्यांची सामान्य लक्षणे प्रथम सांगून मग प्रत्येकाची विशेष लक्षणे पृथक्‌ पृथक्‌ पुढे सांगितली आहेत .

मुलास होणार्‍या ग्रहपीडेची सामान्य लक्षणे .

क्षणादुद्विजते बाल : क्षणात्त्रयत्यति रोदीति ॥

नखैदन्तैर्दारयति धात्रीमात्मानमेव च ॥१७॥

ऊर्ध्वं निरीक्षते दन्तान्‌ खादेत्‌ कूजति जृम्भते ॥

भ्रुवो क्षिपति दन्तौष्ठं फेनं वमति चसकृत्‌ ॥१८॥

क्षामोऽति निशि जगर्ति शूनाङ्गो भिन्नविद‌स्वर : ॥

मांसशोणितगन्धिश्च न चाश्नाति यथा पुरा ॥१९॥

सामान्यं ग्रहजुष्टानां लक्षणं समुदाह्रतम्‌ ॥२०॥

लहान मुलास स्कंदादि नवग्रहांपासून पीडा झाली असता त्यांची सामान्य लक्षणे अशी असतात की , मुल रडते , क्षणांत त्रासते , क्षणात व्याकुळ होते . बुदातांनी व नखांनी आपल्या आईला व आपल्याला ओरबडते , ओरडते , वर पाहते , दांत व ओठ चावते , जांभपा देते , कपाळास आठया घालते , तोंडातून वारंवार फेस येतो , पहियाप्रमाणे खातात . नाही व रात्री निजत नाही ; तसेच त्याचा मळ पातळ असतो , घसा बसतो ; शरीर कृश व रूक्ष होते व त्यास सूज येते व त्यास रक्तमांसाची घाण येते .

स्कंदग्रहपीडेची विशेष लक्षणे .

एकनेत्र्स्य गात्रस्य स्नाव स्पन्दनकम्पनम्‌ ॥

अर्धदृष्टया निरीक्षेत वक्रास्यो रक्तगन्धिक : ॥२१॥

दन्तान्‌ खादति वित्रस्त : स्तन्यं नैवाभिनन्दति ॥

स्कन्दग्रहगृहीतानां रोदनं चात्ममेव च ॥२२॥

स्कंदग्रहाची पीडा असता मुलाच्या एकाच डोळयातून पाणी गळते , याची एकच बाजू स्फुरण पावते , ते कापते व त्याच्या अंगास रक्ताची घाण येते . तोंड वाकडेतिकडे करते , दात करकर खाते , आईच्या अंगावर पीत नाही ; तसेच थोडथोडे रडते , व अर्धाच डोळा उघडून पाहते .

स्कंदापस्मारपीडा लक्षणे .

नष्टसंज्ञो वमेत्‌ फेनं संज्ञावानति रोदिति ॥

पूयशोणितगन्धित्वं स्कन्दापरमारलक्षणम्‌ ॥२३॥

स्कंदापस्मारपीडित मूल वेशुद्ध होते व सावध झाल्यावर फार रडते ; तसेच त्याच्या तोंडास फेस येतो व अंगास पू व रक्त यांची घाण येते .

शकुनीग्रहपीडेची लक्षणे .

स्त्रस्ताङ्गो भयचकितो विहङ्गगन्धि :

सास्नावव्रणपरिपीडित : समन्तात्‌ ॥

स्फोटैश्च प्रचिततनु सदाहपाकै -

र्विज्ञेयो भवति शिशु क्षत : शकुन्या ॥२४॥

लहान मूल शकूनि ग्रहाने पीडित झाले असता ते भिते , दचकते व अगदी अवसान टाकते ; तसेच त्याच्या अंगास पक्ष्याची घाण येऊ लागते अंगावर व्रण पडून त्यांतून लस स्रवते व फोड येऊन ते पिकतात व त्यामुळे आग होते .

रेवतीग्रहपीडा ,

व्रणै : स्फोटैश्चितं गात्रं पङ्कगन्धमसृकस्नवेत्‌ ॥

भिन्नवर्चा ज्वरी दाही रेवतीग्रहलक्षणम्‌ ॥२५॥

रेवतीग्रह्पीडित मूल ज्वर , दाह व अतिसर या लक्षणांनी व्याकुळ होते ; तसेच त्याच्या अंगावर व्रण पडतात , फोड येतात व त्यातून स्रवणार्‍या रक्तास चिखलासारखी घाण येते .

पूतनाग्रहपीडा लक्षणें .

अतीसारो ज्वरस्तृष्णा तिर्यक्प्रेक्षणरोदनम्‌ ॥

नष्टनिद्रस्तथोद्विग्नो ग्रस्त : पूतनया शिशु : ॥२६॥

पूतनाग्रहापासून मुलास पीडा झाली असता ते तिरवे पाहते , पडते , त्यास ज्वर येतो , तहान लागते , अतिसार होतो . ते झोप घेत नाही व अगदी व्याकुळ होते .

अंधपूतना ग्रहपीडा .

छर्दि : कासो ज्वरस्तृष्णा वसागन्धोऽतिरोदनम्‌ ॥

स्तन्यद्वेषोऽतिसारश्च अन्धपूतनया भवेत्‌ ॥२७॥

लहान मुलास अंधपूतनाग्रहापासून पीडा असता ते अतिशय रडते , आईच्या अंगावर पीत नाही , ज्वर , वांति , खोकला , अतिसार व तहान या प्रकारांनी त्यास पीडा होते व त्याच्या अंगास चरबीसारखी घाण येते .

शीतपूतना ग्रहपीडा ,

वेपते कासते क्षीणो नेत्ररोगो विगन्धिता ॥

छर्द्यतीसारयुक्तश्च शीतपूतनया शिशु : ॥२८॥

शीतपूतनाग्रहाने पछाडलेले मूल अगदी वाळते व त्याचे अंग कापते ; तसेच त्यास खोकला , वांति व अतिसार होऊन त्याच्या डोळयांस विकार होतात व अंगास धाण येते .

मुखमंडिका ग्रहपीडा .

प्रसन्नवर्णवदन : शिराभिरभिसंवृत : ॥

मूत्रगन्धिश्च बहवाशी मुखमण्डिकया भवेत्‌ ॥२९॥

मुखमंडिकाग्रहाने मूल पछाडले असता तोंड व कांति टवटवीत असते , अंगावरील शिरा ठळक दिसतात व त्यास मूत्रदुर्गंधी येते ; तसेच या विकारात मूल अतिशय खाते .

नैगमेय ग्रहपीडा .

छर्दिस्पन्दनकण्ठास्यशोषमूर्च्छाविगन्धिता ॥

ऊर्ध्वंपश्येद्दशेद्दन्तान्‌ नैगमेयग्रहं वदेत्‌ ॥३०॥

नैगमेयग्रहापासून पीडा झाली असता मुलीचे अंग कपते व त्यास घाण येते , ते वर पाहते व दात खाते : तसेच त्याच्या घशास व तोंडास कोरड पडते , त्यास वांती होते व ते मुर्च्छित पडते .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP