ग्रंथिरोगाचीं कारणें .
वातादयो मांसमसृक्प्रदुष्टा : सन्दूव्य मेदश्च तथा शिराश्च ॥
वृत्तोन्नतं तु शोथं कुर्वन्त्यतो ग्रन्थिरिति प्रदिष्ट : ॥१॥
वातादि दोषांच्या प्रकोपामुळे रोग्याचे मांस , रक्त , मेद व शिरा या दूषित झाल्या असता जी वाटोळी , उंच व गाठाळलेली अथवा कठीण अशी सूज उद्भवते तिला ग्रंथि असे म्हणतात . या ग्रंथिरोगाचे वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , मेदजन्य व शिराजन्य असे पाच प्रकार आहेत .
वातजन्य ग्रंथि .
आयम्यते वृश्चति तुद्यते च प्रत्स्यते मथ्यति भिद्यते च ॥
कृष्णो मृदुर्बस्तिरिवाततश्च भिन्न : स्नवेच्चानिलजोऽस्नमच्छम् ॥२॥
वातजन्य ग्रंथि ( गाठ ) काळ्या रंगाची , मऊ व बस्तीसारखी मोठी असून ती ताणल्याप्रमाणे , कापल्याप्रमाणे , टोचल्याप्रमाणे , चमकल्याप्रमाणे , घुसळल्याप्रमाणे व फोडल्याप्रमाणे पीडा उत्पन्न करते ; आणि तसेच ती फुटली असता त्यांतून स्वच्छ रक्तस्राव होतो .
पित्तजन्य ग्रंथि .
दन्दह्यते धूम्यति चूष्यते च पापच्यते प्रज्वलतीव चाषि ॥
रक्त : सपीतोऽप्यथवापि पित्ताद्भिन्न : स्नवेद्दष्टमतीव चास्नम् ॥
पित्तजन्य ग्रंथि तांबडी लाल अथवा किंचित पिवळी व भाजल्याप्रमाणे दाहयुक्त अशी असून ती आंतन धूर निधाल्याप्रमाणे , तुमडीने ओढल्याप्रमाणे , क्षार लावून पोळल्याप्रमाणे व आगीचा भडका होत असल्याप्रमाणे , पीडा उत्पन्न करते , व ती अत्यंत पिकते आणि त्यांतून दूषित रक्ताचा पुष्कळ स्राव होतो .
कफजन्य ग्रंथि .
शीतो विवर्णोऽल्परुर्जोऽतिकण्डू : पाषाणवत्संदननोऽपपन्न : ॥
चिराभिवृद्धिश्च कफप्रकोपाद्भिन्न : स्नवेच्छुक्लधनं च पूयम् ॥
कफजन्य ग्रंथि थंड , शरीराच्या वर्णासारखा , थोडी पीडा करणारी , फार कंड असलेली आणि दगडाप्रमाणे कठीण व मोठी अशी असून ती फार दिवसांनी वाढते व फुटली असता त्यातून घट्ट पांढर्या पुवाचा स्राव होतो .
मदजन्य ग्रंथि .
शरीरवृद्धिक्षयवृद्धिहानि : स्निग्धो महान्कण्डुयुतोऽल्परुक् च ॥
मेद : कृते गच्छति चात्र भिन्ने पिण्याकसर्पि : प्रतिमं च मेद : ॥५॥
मेदजन्य ग्रंथि ही मोठी , तुळतुळीत , कंड असलेली व वेदना फार नसलेली अशी असून ती शरीर पुष्ट झाले असता वाढते व क्षीण झालेअ सता बारीक होते ; तसेच ती फुटली असता त्यातून तिळाच्या पेंडेसारखा अथवा थिजलेल्या तुपासारखा मेदस्राव होतो .
शिराजन्य ग्रंथिरोगाचीं लक्षणें .
व्यायामजातैरबलस्य तैस्तैराक्षिप्य वायुस्तु शिराप्रतानम् ॥
सङ्कुच्य सम्पीडय विशोष्य चापि ग्रन्थिं करोत्युन्नतमाशुकृच्च ॥
ग्रन्थि : शिराज : स तु कृच्छ्रसाध्यो भवद्येदिस्यात्सरुजश्चलश्च ॥
अरुक् स एवाप्यचलो महांश्च मर्मोत्थितश्चापि विवर्जनीय : ॥७॥
अशक्त प्रकृतीच्या रोग्याने शरीराला कष्ट देणारी अनेक कामे केली असता त्याचा वायु प्रकोप पावून तो त्याच्या शिराजालास संकोचित , बेदनायुक्त व शुष्क करून टाकतो व त्या ठिकाणी तात्काल उंच व वर्तुळ अशी ग्रंथि ( ग्रंथि ) उत्पन्न करते . अशा प्रकारे उद्भवलेली ही शिराजन्य ग्रंथि कष्टाने बरी होणारी आहे . जेव्हा ती वेदनायुक्त व चंचल अशी असते तेव्हा ती कष्टसाध्य समजून वैद्याने त्यावर उपाय करावा ; पणजर वेदनारहित , निश्चल , मोठी अथवा मर्मस्थानी झालेली असली तर असाध्य म्हणून ती सोडून द्यावी .