संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
वृषणवृद्धिनिदान

माधवनिदान - वृषणवृद्धिनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


वृषणवृद्धिनिदान

वृषणवृद्धीची संप्राप्ति .

क्रुद्धोऽनूर्ध्वगतिर्वायु : शोथशूलकरश्चरन्‌ ॥

मुष्कौ वङक्षणत : प्राप्य फलकोशाभिवाहिनी : ॥

प्रपीडय धमनीर्वृद्धिं करोति फलकोशयो : ॥१॥

शरीरात अधोगतीने जाणारा व सूज आणि वेदना उत्पन्न करणारा असा दूषित वायु रोग्याच्या कुक्षीत जेव्हा संचार करतो तेव्हा जर तो वृषणसंधीतून वृषणात उतरला तर वृषणाची गोळी व पिशवी या दोहोंशी संबंध असणार्‍या नाडीस दुषित करून वृषणाच्या दोन्ही अथवा एक बाजू मोठी करतो .

वृषणवृद्धि रोगाचे प्रकार

दोषास्नमेदोमूत्रान्त्रे : स वृद्धि : सप्तधा गद : ॥

मूत्रान्त्रजावप्यनिलाद्धेतुभेदस्तु केवलम्‌ ॥२॥

वर सांगितल्या प्रकारचा हा वृषणवृद्धि रोग वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , रक्तजन्य , मेदजन्य , मूत्रजन्य व अंत्रजन्य या सात प्रकारांनी होतो . त्यांत शेवटच्या दोन प्रकारांची संपाप्ति वायूपासून होते ; मात्र त्यांची कारणे भिन्न असतात .

वातपूर्णादतिस्पर्शो रुक्षो वातादहेतुरुक्‌ ॥

कृष्णस्फोटावृत : पित्तवृद्धिलिङ्गश्च पित्तज : ॥३॥

कफवन्मेदसो वृद्धिर्मृदुस्तालफलोपम : ॥

वातजन्य वृषणवृद्धि रोगात वृषणकोश ( पिशवी ) रूक्ष कारणावाचून दुखणारा व वायु भरल्याप्रमाणे हातास लागणारा असा असतो . तित्तजन्य व रक्तजन्य रोगांत [ वृषणकोश ] काळया फोडांनी व्यापलेला दिसतो व ह्या रोगात वाढलेल्या पित्ताची वृद्धिलक्षणे दिसतात आणि कफजन्य व मेदजन्य प्रकारांत तो [ वृषणकोश ] मऊ व पिकलेल्या ताडगोळयासारखा पिवळा आणि वाटोळा होतो , व तसेच हा रोग आपल्या लक्षणांनी कफ वाढवतो .

मूत्रजन्य वृषणवृद्धीची कारणें व लक्षणें .

मूत्राधारणाशीलस्य मूत्रय : स तु गच्छत : ॥४॥

अम्भोभि : पूर्णद्दतिवत्‌ क्षोभं याति सरुङ म्रुदु : ॥

मूत्रकृष्णमध : स्याच्च चलयन्फलकोशयो : ॥५॥

मूत्रजन्य वृषणवृद्धि रोग हा ज्यास मूत्र कोंडून धरण्याची सवय लागलेली असते त्यास होतो , याची लक्षणे अशी द्दष्टीस पडतात की ,

रोग्यास साफ लध्वीला होत नाही व तो चालू लागला असता त्याचा वृषणकोश झोळीसारखा खाली लोंबून हेलकावे खातो , पाण्याने भरलेल्या पखालीसारखा डबक्‌ डबक्‌ वाजतो , आणि तस्टाच किंचित दुखतो व हातास मऊ लागतो .

आंत्रवृद्धीची कारणें वगैरे .

वातकोपिभिराहारै : शीततोयावगाहनै : ॥

धारणेरणभारध्वविषमाङ्गप्रवर्तनै : ॥६॥

क्षौभणै : क्षुभितोऽन्यैश्च क्षुद्रान्त्रावयवं यदा ॥

पवनो विगुणीकृत्य स्वनिवेशादधो नयेत्‌ ॥७॥

कुर्याद्वङूक्षणसन्धिस्थो ग्रन्थ्याभं श्वयथुं तदा ॥

वातप्रकोप करणार्‍या अन्नाचे सेवन करणे , गार पाण्यात बुडया मारणे , आलेला वेग आवरून धरणे अथवा ( वेग ) आला नसता बळचे त्याची प्रेरणा करणे , मोठाली ओझी वाहणे , अतिशय चालणे , वेडयावाकडया रीतीने शरीराचे व्यापार करणे व बलिष्ठ पुरुषाशी कुस्ती खेळणे वगैरे कारणांनी कुपित झालेला वायु रोग्याच्या आतडयाचा एक लहानसा अंश घेऊन जेव्हा तो दुमडून अथवा संकोचित करून त्यास त्याच्या स्थानापासून खाली नेतो तेव्हा तो अंश जांगाडयाच्या संधीत राहुन त्या ठिकाणी एक गोळा उत्पन्न करतो .

उपेक्यमाणस्य च मुष्कवृद्धिमाध्मानरुक्‌स्तम्भवतीं स वायु : ॥८॥

प्रपीडितोऽन्त : स्वनवान्‌ प्रथाति प्रध्मापयन्नेति पुनश्च मुक्त : ॥

त्याची उपेक्षा झाली असता आंत्रजन्य वृषणवृद्धि रोग होतो व त्यांत फुगारा ’ कळ व ताठरपणा असून रोग्याचा वृषण हाताने दाबला तर त्यांतील वायु कों कों असा शब्द करत वर चढतो व वृषण रिकामा होतो आणि हात सोडला की पुन : तो वायु खाली उतरतो व वृषण भरतो .

अन्त्रवृद्धिरसाध्यो यं वातवृद्धिसमाकृति : ॥९॥

हा आंत्रवृद्धि रोग ( अंतर्गळ ) असाध्य असून त्याची लक्षणे वातवृद्धीसारखी असतात .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP