मेदोरोगनिदान
मेद होण्याचीं कारणें
अव्यायामदिवास्वप्नश्लेष्मलाहारसेविन : ॥
मधुरोऽन्नरस प्राय : स्नेहान्मेदो विवर्धयेत् ॥१॥
मेदसावृतमार्गत्वात्पुष्यन्त्यन्ये न धातव : ॥
मेपस्तु चीयते यस्मादशक्त : सर्वकर्मसु ॥२॥
व्यायाम न करणे , दिवसा झोप घेणे व तसेच कफकारक पदार्थ सेवन करणे या कारणंमुळे मनुष्याच्या शरीरांतील मधुर अन्नरसापासून उत्पन्न झालेला स्निग्ध पदार्थ बहुतकरून मेद्व वाढवतो ; मग त्या मेदामुळे दुसर्या सर्व धातूंचा मार्ग बंद होऊन अन्य धातु पुष्ट होत नाहीत व मेदच नुसता साचून राहतो आणि अशा - प्रकारचा हा मेदोरोग झालेला मनुष्य कोणतेही कर्म करण्याविषयी असमर्थ होतो .
मेद झालेल्याचीं लक्षणें .
क्षुद्रश्वासतृषामोहस्वप्नक्रथनसादनै : ॥
युक्त : क्षुत्स्वेददौर्गन्ध्यैरल्पप्राणोल्पमैथुन : ॥३॥
मेदस्तु सर्वभूतानामुदरेष्वस्थिषु स्थितम् ॥
अतएवोदरे वृद्धि : प्रायो मेदस्विनो भवेत् ॥४॥
मेद हा सर्व प्राणिमात्रांच्या हाडात व पोटात आहे आणि म्हणूनच तो हा रोग झालेल्या पुरुषांच्या पोटात बहुतकरून वाढत असतो . या रोगात क्षुद्रश्वास , तहान , मूर्च्छा , झोप व क्षुधा या लक्षणांनी रोगी युक्त असून त्यास अकस्मात श्वासावरोध होतो , घाम येतो , शरीर शिथिल पडते व त्यास घाण येते ; तसेच त्याची शक्ति क्षीण होते व तो स्त्रीसंगाविषयी फार समर्थ नसतो .
मेदाची एक विशेष अवस्था .
मेदसावृतर्मागत्वाद्वायु : कोष्ठे विशेषत : ॥
चरन् सन्धुक्षयत्यग्निमाहारं शोषयत्यपि ॥५॥
तस्मात्स शीघ्रं जरयत्याहारं चापि काङक्षति ॥
विकारांश्चाश्रते घोरान्कांश्चित्कालव्यतिक्रमात् ॥६॥
एतावुपद्रवकरौ विशेषादग्निमारूतौ ॥
एतौ हि दहत : स्थूलं वनं दावानलो यथा ॥७॥
वर सांगितलेल्या लक्षणांशिवाय मेद झालेल्या रोग्याची एक विशेष अवस्था द्दष्टीस पडते . ती अशी की , मेदामुळे ( सर्व धातूंचा ) मार्ग बंद झाला असता कोठयांत वायूचा संचार अतिशय होऊन तो त्याने खाल्लेला आहार शोषून टाकतो व अशा रीतीने तो आहार तत्कालच पचला गेला असता त्यास ( रोग्यास ) पुन : जेवन्याची इच्छा होते . लौकर जेवणास मिळाले नाही तर त्याच्या ठायी भयंकर विकार उद्भवतात . अशा प्रकारच्या मेदोरोगांत ( विशेषेकरून ) अग्नि व वायु हे इतके उपद्रवकारक होतात की जसा वणवा रान बाळून ठाकतो तसे ते रोग्यास जाळून टाकतात .
मेद वाढल्याचा
मेदस्यतीव संवृद्धे सहसैवानिलादय : ॥
विकारान्दारुणान्कृत्वा नाशयन्त्थाशुजीवितम् ॥८॥
मेद अत्यंत वाढला असता वातादि दोष अकस्मात् भयंकर रोग ( ज्वर , भगंदर , प्रमेहपीटिका वगैरे ) उत्पन्न करून तत्काल मेदोरोग्याचा शेवट करतात .
मेदोमासातिवृद्धत्वाच्चलस्फिगुदरस्तन : ॥
अयथोपचयोत्साहो नरोऽतिस्थूल उच्यते ॥९॥
मेद आणि मांस ही अत्यंत वाढून रोग्याचे कुल्ले , पोट व स्तन हे शिथिल होऊन लटलट हालू लागले , शरीराची वाढ यथायोग्य झाली नाही ( म्हणजे भलताच एखादाच अवयव लष्ठ होऊन ते बेढब दिसू लागले ) आणि अयोग्य अशी वाढ व उत्साह झाला म्हणजे त्यास अतिस्थूल अशी संज्ञा देतात .