शिरोरोगाचे प्रकार . ( मस्मकशूल )
शिरोरोगास्तु जायन्ते वातपित्तकफोस्त्रिभि : ॥
सन्निपातेन रक्तेन क्षयेण कृमिभिस्तथा ॥१॥
सूर्यावर्तानन्तवातार्धावभेदकशङखकै : ॥
शिरोरोग अथवा मस्तकशूल याचे अकरा प्रकार आहेत . त्यांची नावे - वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , सान्निपातिक , रक्तजन्य , क्षयजन्य , कृमिजन्य , सूर्यावर्त , अनंतवात , अर्धावभेदक आणि शंखक याप्रमाणे जाणावी ,
वातजन्य यस्यानिमित्तं शिरसो रूजश्च भवन्ति तीव्रा निशि चातिमात्रम् ॥
शिरोरोग . बन्धोपतापै : प्रशमश्च यत्र शिरोभिताप : स समीरणेन ॥२॥
वातजन्य शिरोरोगात वातप्रकोपामुळे काही कारण नसता डोक्याच्या ठिकाणी एकाएकी वेदना उद्भवतात व त्या रात्रीस अतिशय जोर करतात . तसेच डोके बांधले असता अथवा शेकले असता त्या उतरतात .
पित्तजन्य यस्योष्णमङ्गारचितं तथैव भवेच्छिरो दह्यति वाऽक्षिनासा ॥
शिरोरोग . शीतेन रात्रौ च भवेच्छमश्च शिरोऽभिताप : स तु पित्तकोपात् ॥३॥
पित्तजन्य शिरोरोगांत पित्तप्रकोपामुळे डोके विस्तव ठेवल्याप्रमाणे तापते व डोळे आणि नाक यांची आग होते . तसेच शीतोपचार केला असता ते उतरते व डोळे आणि नाक यांची आग नाहीशी होते .
कफजन्य शिरो भवेद्यस्य कफोपदिग्धं गुरू प्रतिस्तब्धमथो हिमं च ॥
शिरोरोग . शूलाक्षिकूटं वदनं च यस्यशिरोऽभिताप : स कफप्रकोपात् ॥४॥
कफजन्य शिरोरोगांत कफप्रकोपामुळे डोके जड , थंड व आतून कफाने व्यापल्याप्रमाणे होते . ते घट्ट वस्त्राने बांधल्यासारखे वाटते व डोळयांभोवतीचे भाग सुजतात
सान्निपातिक , शिरोऽभितापे त्रितयप्रवृत्ते सर्वाणि लिङ्गानि समुद्भवन्ति ॥ .
सान्निपातिक शिरोरोगांत वर सांगितलेली तिन्ही दोषांची निरनिराळी लक्षणे एकत्र झालेली द्दष्टीस पडतात .
रक्तजन्य . रक्तात्मक : पित्तसमानलिङ्ग : स्पर्शासहत्वं शिरसो भवेच्च ॥५॥
रक्तजन्य शिरोरोगात वर सांगितलेली पित्तजन्य शिरोरोगाची सर्व लक्षणे उत्पन्न होऊन त्याशिवाय डोक्याला स्पर्शही सहन न होणे हा प्रकार अधिक असतो .
क्षयजन्य शिरोरोगाचीं लक्षणें .
असृग्वसाश्चेष्मसमीरणानां शिरोगतानामिह संक्षयेण ॥
क्षय : प्रवृत्त : शिरसोऽभिताप : कष्टो भवेदुग्ररूजोऽतिमात्रम् ॥
संस्वेदनच्छर्दनधूमनस्यैरसृग्विमोक्षैश्च विवृद्धिमेति ॥
क्षयजन्य शिरोरोग हा मस्तकातील वायु , कफ , रक्त व चर्बी यांचा क्षय झाल्यामुळे होतो . यात रोग्याचे डोके अतिशय तापते , त्यास पुष्कळ शिंका येतात , व ( डोक्यामध्यें भयंकर वेदना होतात . दुसर्या प्रकारचे शिरोरोग ( मस्तकशूल ) रोग्यास घाम आणल्याने , ओकारी आल्याने , धूम्रपान करवल्याने , शिरातून रक्त काढल्याने अथवा नाकात औषध ( नस्य ) घातल्याने नाहीसे होण्याचा संभव असतो ; पण क्षयजन्य शिरोरोग या उपायांनी कमी न होता उलटा अधिकच वाढतो .
कृमिजन्य निस्तुद्यते यस्य शिरोऽतिमात्रं सभक्ष्यमाणं स्फुरतीव चान्त : ॥
शिरोरोग घ्राणाच्च गच्छेत् रुधिरं सपूयं शिरोऽभिताप : कृमिभि : स घोर : ॥
मस्तकातील रक्तवसदि धातु दूषित होऊन त्यांत कृमि पडून महाभयंकर असा कृमिजन्य शिरोरोग उद्भवतो . यात कृमि डोके पोखरतात व त्यामुळे त्यात ( डोक्यात ) सुयांनी टोचल्यासरख्या वेदना होतात व ते वारंवार स्फुरण पावते ; तसेच नाकावाटे रक्तमिश्रित पूवाहतो व त्यातून कधी कधी कृमिही बाहेर येतात .
सूर्यावर्त शिरोरोगाचीं लक्षणें .
सूर्योदयं वा प्रति मन्दमन्दमक्षिभ्रुवं रुक्समुपैति गाढम् ॥
विवर्धते चांशुमता सहैव सूर्याप्रवृत्तौ विनिवर्तने च ॥
सर्वात्मकं कष्टतमं विकारं सूर्यापवर्तं तमुदाहरन्ति ॥
शीतेन शान्तिं लभते कदाचिदुष्णेन जन्तु : सुखमाप्नुयाद्वा ॥८॥
शिरोरोगांपैकी सूर्यावर्त हा प्रकार त्रिदोषजन्य आहे . याची लक्षणे अशी असतात की , सूर्योदय होताच कपाळ , डोळे व भुव्या दुखण्यास प्रारंभ होतो व मग जसजसा सूर्य चढत जाईल तसतशा त्याच्या वेदना वाढत जातात व तो ( सूर्य ) उतरत चालला म्हणजे त्या ( वेदना ) कमी कमी पडू लागतात आणि तो मावळला म्हणजे त्याही नाहीशा होतात . सुर्याच्या गतीशी या रोगाचा असा संबंध असल्यामुळे यास हे नाव दिलेले आहे . हा रोग कष्टसाध्य आहे . यात होणार्या वेदनांवर थंड व क्वचित् उष्ण उपचार केले असता रोग्यास बरे वाटते .
अनंतवात शिरोरोगाचीं लक्षणें .
दोषास्तु दुष्टास्त्रय एव मन्यां संपीडय घाटासु रुजां सुतीव्राम् ॥
कुर्वन्ति योऽक्षिभ्रुवि शङ्खदेशे स्थितिं करोत्याशु विशेषतस्तु ॥९॥
गण्डस्य पार्श्वे च करोति कम्पं हनुग्रहं लोचनजांश्च रोगान् ॥
अनन्तवातं तमुदाहरन्ति दोषत्रयोत्थं शिरसो विकारम् ॥१०॥
वातादि त्रिदोषप्रकोपामुळे होणार्या अनंतवात नामक शिरोरोगाची लक्षणेमानेच्या मागील शिरा ( वातादि दोषांच्या जोरामुळे ) जखडल्या जातात व डोळे , भुवया आण आख यांच्या ठिकाणी ( तिन्ही दोष राहिल्यामुळे ) तीब्र वेदना उद्भवतात ; तसेच गाल कापतात . हनुवटी ताठते आणि डोळयांत ( मागे नेत्ररोगात सांगितल्यापैकी ) अंधत्वादि विकार होतात याप्रमाणे जाणावी .
अर्धावभेदक शिरोरोगाचीं लक्षणें . ( अर्धशिसी )
रूक्षाशनात्यध्यशनप्राग्वातावश्यामैथुनै : ॥
वेगसंधारणायासव्यायामै : कुपितोऽनिल : ॥११॥
केवल : सकफो वाऽर्धं गृहीत्वा शिरसो बली ॥
मन्याभ्रुशङखकर्णाक्षिललाटाऽर्धेऽतिवेदनाम् ॥१२॥
शस्त्ररणिनिभां कुर्यात् तीव्रां सोऽर्धावभेदक : ॥
नयनं वाऽथवा श्रोत्रमभिवृद्धो विनाशयेत् ॥१३॥
अर्धावभेदक अथवा अर्धशिशी या शिरोरोगाची उत्पत्ति रूक्ष अन्न खाल्ल्याने , अतिरिक्त जेवल्याने अथवा जेवणावर जेवल्याने , तसेच पूर्व दिशेचा वारा लागल्याने , हिमवृष्टि , श्रम , व्यायाम अथवा स्त्रीसंग केल्याने आणि मलमूत्रादिकाच्या वेगाचा अवरोध घडल्याने कुपित होणार्या नुसत्या वायूपासून अथवा कफ आणि वायु या दोन्ही दोषांपासून होते . यात ( आता सांगितलेल्या कारणांनी दूषित झालेला नुसता कफयुक्त असा ) वायु मस्तकाची अधींच बाजू घरतो व त्या बाजूच्या मानेच्या शिरा , कान , आख , भुवयी , डोळा व ललाट यांच्या ठिकाणी कुर्हाडीने फोडल्यासारख्या अथवा रवीने घुसळल्यासारख्या वेदना करतो . तसेच हा रोग फार दिवस राहिला असता त्या बाजूचा एक डोळा जातो अथवा कान बहिग होतो . ( हा रोग सान्निपातिक आहे असे कोणी वैद्य म्हणतात .)
शंखनामक शिरोरोगाचीं लक्षणें .
पित्तरक्तानिला दुष्टा : शङखदेशे विमूर्च्छिता : ॥
तीव्ररुग्दाहरागं हि शोथं कुर्वन्ति दारुणम् ॥१४॥
स शिरो विषवद्वेगी निरुन्ध्याशु गलं तथा ॥
त्रिरात्राज्जीवितं हन्ति शङ्खको नामत : परम् ॥१५॥
त्र्यहाज्जीवति भैषज्यं प्रत्याख्याय समाचरेत् ॥
दूषित झालेले वात , पित्त , रक्त व ( कफ देखील ) प्रकोप पावून फार वाढले असता शंखक नामक शिरोरोग उत्पन्न करतात . त्याचा प्रकार असा की कानशिलावर अखाच्या ठिकाणी भयंकर सूज येते , ती लाल असते , तिची आग होते व तिला ठणकाही फार असतो . तसेच विषाच्या वेगाप्रमाणे ती त्वरेने वाढून गळाभर पसरते व त्याचा रोघ करून तीन दिवसांत हटकून प्राण घेते . याप्रमाणे हा शंखक रोग आहे . हा झाला असता तीन दिवसांत चांगल्या वैद्याकडून त्याची चिकित्सा झाली तर यातून रोगी वाचण्याचा संभव आहे , तरी पण खात्री देता येत नाही . यासाठी वैद्याने कदाचित् [ एवीतेवी हा मरणार हे ठरलेलेच आहे ; पण औषधाने कदाचित् वाचण्याची आशा आहे . तर यत्न का करू नये नसे ] प्रतिकुल मत देऊन मग चिकित्सा करावी .