श्रीदत्त भजन गाथा - वासुदेव चरित्रसार
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
उत्सवाचेसाठी मागे साक्षात्कार । प्रसादहि थोर वासुदेवा ॥१॥
आम्हांसाठी नर-जन्म तुझा असे । जगदुद्धारा असे मनुजरुप ॥२॥
ब्राह्मण-वंशालागी धन्य करायासी । सकळां दावायासी आचार की ॥३॥
वर्णाश्रम-धर्म सकळ आचरुनी । प्रगट त्रिभुवनी केले तुवां ॥४॥
कलियुगी वर्ण धर्म पाळुं येती । मनाची निश्चिती पाहिजे कि ॥५॥
निर्धार जयासी आचरुं शके तो । तया न बाधतो कलिकाळ ॥६॥
सनातन धर्म ऐसा उभारिला । न जुमानी तयाला कदापिही ॥७॥
कृत त्रेता किंवा द्वापार कलि असो । स्वधर्मी राजा असो किंवा म्लेच्छ ॥८॥
धर्मनिष्ठालागी सकल वंदिती । साहायते होती दुष्ट शिष्ट ॥९॥
हेच तत्व आम्हां दावायाकारण । केले आचरण वर्ण-धर्म ॥१०॥
याही युगी होती सिद्ध वेदमंत्र । दावील्या विचित्र सिद्धि लीला ॥११॥
आम्हांसाठी जन्म आम्हांसाठी धर्म । आश्रम पालन आम्हांसाठी ॥१२॥
लेखन ग्रंथांचे केले आम्हांसाठी । तुवां जगजेठी वासुदेवा ॥१३॥
भजनमार्ग आम्हां तुम्ही शिकविला । भक्तीचा दाविला आम्हां पंथ ॥१४॥
स्वये योगी ज्ञानी वेष तो संन्यासी । परि भजनासी नित्य केले ॥१५॥
दत्तसेवनाचा पुरस्कार केला । स्वये उपासनेला चालविले ॥१६॥
उपासना-मार्ग जगी स्थापियेला । गरुडेश्वरी केला निजवास ॥१७॥
तेथे निजरुपी प्रभो लीन झालां । आषाढ प्रतिपदेला आनंदाने ॥१८॥
मध्यरात्रीचे की समयी लीन झाला । स्वरुपी मिसळला वासुदेवा ॥१९॥
तेच उत्सवकार्य पातले हे थोर । म्हणुनी साक्षात्कार करावा की ॥२०॥
विनायक म्हणे श्रीगुरुवासुदेवा । वैभव प्रगटवा आपुले गा ॥२१॥
N/A
References : N/A
Last Updated : January 05, 2020
TOP