श्रीदत्त भजन गाथा - दर्शनसुख
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
माझी वस्तु मज सांपडेना कैशी । कैशा मी भ्रमासीं पडलोंसे ॥१॥
माझे ठायीं देव शोधितो बाहेर । तव तो दिसे दूर अज्ञानाला ॥२॥
दुराहूनई दूर अत्यंत जवळी । आहे वनमाळी जैसा भाव ॥३॥
आपणा पै दुजा पहात त्यासी । दावीत भावासीं दुजीयास ॥४॥
परी अपुल्याठायी पहातां तयासीं । स्मित वदनासी दावी जरी ॥५॥
अर्धमिलित डोळे स्मित विकसोन । वदन प्रसन्न दावितसे ॥६॥
वांकुडा पाहातो डोळे मिचकीतो । विस्मय दावितो मुखावरी ॥७॥
सस्मित आनंद हळुच दावितो । आपण डोलतो माझ्यापरी ॥८॥
सुखाचा हा गाभा अमृतसागर । नयन-मनोहर चारु मूर्ति ॥९॥
पहातां पहातां स्मित आनंदाचे । पारणे नेत्रांचे फ़िटतसे ॥१०॥
किती मधुरता अमृत सांडते । मति हे विरते स्मितामाजी ॥११॥
मधुरमंद हास्य वेडावूनी सोडी । उपाधिते तोडी जगताच्या ॥१२॥
डुलावे नाचावे रंगोनियां जावे । घट्ट ते धरावे मधुरस्मित ॥१३॥
आकण्ठ हे तृप्ति सर्व इंद्रियांसी । येथील सुखासी वर्णवेना ॥१४॥
लाचावले मन स्वरुपी मोहून । अमृताचे पान तुच्छ वाटे ॥१५॥
गेलो वेडावुनि भान विसरलो । दत्तरुप झालो पहातां पहातां ॥१६॥
मायेचे विन्दान गेले हारपून । भ्रम हा दारुण तिच्यायोगे ॥१७॥
गुढ पाहतां द्त्ता गूढसा वाटतो । कधी न सांपडतो दुरी जातां ॥१८॥
अंतरांत त्यासी नित्य पाही योगी । शांतिसुख भोगी तोचि एक ॥१९॥
विनायक म्हणे अनुभव खुण । बोलवी आपण दत्तात्रेय ॥२०॥
==
दर्शनसुख
किती शांति माझ्या जीवा । पाहतां या दत्तदेवा ॥१॥
किती जाऊं मी रंगून । ठेवी ऐसा गुंगवून ॥२॥
अनुपम किती सुख । पहातां हे तव सुख ॥३॥
ऐसाच राहा माझे पुढे । पाहूं तूतें वाडे कोडे ॥४॥
पुरवी जीवाचे कोडे । नको माझ्या मना मोड ॥५॥
सुखाचे हे लेणे मज । कोण सांडिल सहज ॥६॥
कोण ठेवी देहभान । कशाला तो अभिमान ॥७॥
सुवास तो वैजयंतीचा । मोहवीतो मज साचा ॥८॥
अमृताचे हे अमृत । शब्दसृष्टि न चलत ॥९॥
तृप्तिचीही तृप्ति असे । समाधान आकारलेसे ॥१०॥
विनायक दत्त झाला । दत्ताठायी तो विरला ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : January 05, 2020
TOP