श्रीदत्त भजन गाथा - ईशसेवनासक्ती
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
प्रेमा भजनाचा कथा कीर्तनाचा । तुझीये पूजेचा मजलागी ॥१॥
तुजलागी गावे तुजला वर्णावे । तुजला सेवावे परोपरी ॥२॥
रात्रंदिन काळ सेवेत घालावा । देह जागवावा कीर्तनांत ॥३॥
मन तुझ्या गुणीं मन तुझ्या रुपी । मन गुणालापी रमवावे ॥४॥
ऐशी मज आहे आवड प्रेमाची । पुरवील साची कोण सांग ॥५॥
अष्टौप्रहर तुझ्या सेवेत वागावे । सर्वस्व अर्पावे तुझ्या ठायी ॥६॥
तन मन धन तुझेच करावे । आसक्त न व्हावे कोठे मने ॥७॥
महदासक्ती एक तुझ्या सेवनाची । याहुनीयां साची नको दुजी ॥८॥
विनायक म्हणे तुज कळविले । अंतरींचे भले सांगितले ॥९॥
==
धांवा
घेवोनियां सेवा नाथ आजवरी । आतांच कां तरी उपेक्षितां ॥१॥
कोणा हीनपणा येईल तो सांगा । सांगा रमारंगा सांगा मज ॥२॥
उणेपणा तुम्हां तुमचीया स्थाना । येई दयाघना मज वाटे ॥३॥
आपुला अभिमान आपण राखावा । दास न लोटावा दूर देवा ॥४॥
दु:खाची कहाणी तुजवीण कोणा । सांगुं नारायणा सांग मज ॥५॥
ज्याचेवरी आजपर्यंत भाळलो । बहु विश्वासलो ज्याचेवरी ॥६॥
तयाहुनी अन्या कोणा मी चिंतावे । रक्षण मागावे कोणापाशी ॥७॥
बाळाभ्यासी देवा तुझीये सेवेचा । तुज ठावा साचा गुरुनाथ ॥८॥
शक्ती जैसी माझी तैसे मी साहीले । द्वंदालागी भले तुझ्यासाठी ॥९॥
नको लोटूं दूर पामर अभागी । कोण याचा जगी आधार बा ॥१०॥
विनायक म्हणे करुणा माझी यावी । वृत्ती तुझी द्रवावी वासुदेवा ॥११॥
==
धांवा
कठोर नको होऊं मायाळू स्वभाव । तुझा वासुदेव नित्याचा की ॥१॥
नित्य स्वभावासी सोडूं नको देवा । माझ्या वासुदेवा जिवलगा ॥२॥
माझ्य़ा अंतरींच्या प्राणाच्या सखया । जीवाच्या विसांवीया वासुदेवा ॥३॥
किती तुज स्तवूं तुजला आळवूं । किती मी विनवूं परोपरी ॥४॥
किती आळवणी करुनीयां घेणे । अंत किती पाहणे सांग देवा ॥५॥
करुणेचा तुझा नित्याचा स्वभाव । तोच आतां भाव प्रगटावा ॥६॥
नको चोरु पान्हा माझे गे माउली । पाखर तुझी ओली सदा असे ॥७॥
परके वत्स नोहे तुझेच गे माये । परतोनी जाये कोणाकडे ॥८॥
आजवरी मज पाखर दिधली । क्षुधा शमविली माझी माये ॥९॥
मज तान्हुल्यासीं उपाशी कां माये । मारतेस सये माउली गे ॥१०॥
निष्ठुरपण कैसे कोठूनियां आले । मज न समजले कृपावंता ॥११॥
विनायक आला तुज काकुळती । लोळे पायवरती तुझ्या माये ॥१२॥
==
धांवा
दुष्टांसीही दया आणी करुणावाणी । तुज चक्रपाणि कां न येत ॥१॥
पाषाण ही देवा द्रवेल वाटतो । कां न उडी घेतो माझा दत्त ॥२॥
कोठे गुंतला तो सखा माझा नाथ । धनी माझा समर्थ कोठे आहे ॥३॥
अनाथ मी काय नाथ मज असतां । सांग अवधूता सांग आतां ॥४॥
काय माझी वाणी तुझीया श्रवणी । नाहींच चक्रपाणि पडली का ॥५॥
काय तूं निर्धार केलासी समर्था । क्षमा मज नाथा करणे नाही ॥६॥
परी तुझा निर्धार मजसी ठाउका । आहे विश्वपालका पदोपदी ॥७॥
घातलीस उडी मजसी तारिले । संकट निवारले देवा माझे ॥८॥
तोच का तूं देव निष्ठूर झालासी । निर्धार केलासी तूंच काय ॥९॥
परी तुझा देवा निर्धार चालेना । तुज कठिणपणा नाही नाही ॥१०॥
निर्धाराचा नाही देवा तुझा स्वभाव । भलताच भाव धरीतोस ॥११॥
ज्याचा नोहे धर्म तेणे तो न करावा । भलता आदरावा योग्य नोहे ॥१२॥
परधर्म आहे बहु भयावह । त्यांत तो संदेह मुळी नाही ॥१३॥
पारक्य धर्माचा नको अंगिकार । करुं तूं निर्धार दत्तात्रेया ॥१४॥
दया हाच धर्म दया हा स्वभाव । तुझा कृपाभाव सर्वकाळी ॥१५॥
विनायक आहे तुझा पददास । तुझा सहवास घडलासे ॥१६॥
==
धांवा
तुझ्या सहवासे पूर्ण मी जाणतो । स्वभाव ओळखितो तुझा दत्त ॥१॥
जरी साह्यगिरीवरी तूं अससी । टेंभा मिरविसी व्रात्यत्वाचा ॥२॥
तरी लगबग देवा धांवसील । उचलोनी घेसील मजलागी ॥३॥
निर्लज्ज तूं देवा तुज लाज नाही । धांवशील पाही मजलागी ॥४॥
निर्धार मी तुझा चालूं न देईन । मजला आणीन धांवतचि ॥५॥
ऐसा आहे माझा दृढ आत्मविश्वास । जाणतो मी खास तुजलागी ॥६॥
मजलागी नोहे नोहे तूं बा नवा । तुज दत्तदेवा जाणतो मी ॥७॥
आजवरी मज तुझा सहवास । कधी वियोगास घडले न ॥८॥
आसनी शयनी विलास समयी । कोणत्याही समयी माझेपाशी ॥९॥
नित्य दत्ता तुझा वास जाण आहे । मी तो जाणताहे तुजलागी ॥१०॥
तुझे वर्म आहे मजलागी ठावे । ओढोनी न आणावे आतां दत्ता ॥११॥
काय मी पाहुणा परका असे आलो । योगाते पावलो नाही काय ॥१२॥
तुझा माझा योग बहुत जन्माचा । नोहे नवा साचा आज दत्ता ॥१३॥
तुजलागी जाणे तूं मजसी जाणसी । आम्ही उभयतांसी जाणतोच ॥१४॥
परस्परां आहे खूणगाठ ठावी । तरी उडी घ्यावी आतां दत्ता ॥१५॥
विनायके किती तुजसी प्रार्थावे । किती विनवावे दयावंता ॥१६॥
==
धांवा
धांव धांव आतां देवा । धरोनीयां कृपाभावा ॥१॥
अपराध क्षमा करी । धांव घेई तूं सत्वरी ॥२॥
किती आतां वाट पाहूं । देवा कष्ट किती साहूं ॥३॥
कोण चिंता निवारीता । कोण मज भयत्राता ॥४॥
संकटांत कोण वाली । कोणा दया येई भली ॥५॥
कोण घालील बा उडी । मजसाठी नाथ तातडी ॥६॥
तरी आतां पुरुषोत्तमा । पूर्ण करा माझ्या कामा ॥७॥
उडी घालोनियां येई । बाळासाठी जैशी आई ॥८॥
तुजपुढे किती रडूं । किती सांग की आरडूं ॥९॥
आक्रोश माझा पाहोनियां । सौख्य काय तव ह्रदया ॥१०॥
किती आक्रोश करावा । किती अंत त्वां पहावा ॥११॥
तरी आतां उडी घाल । तुजसम तूं दयाळ ॥१२॥
विनायके दोन्ही चरण । धरिले तुझे नारायण ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 16, 2020
TOP