श्रीदत्त भजन गाथा - नरकासुर वध
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता . ३१/१०/१९२९
ऐरावतस्थित इन्द्र कृष्णापाशी । आपुल्या दु:खासी निवेदित ॥१॥
प्राग्जोतिष पुरी भौमासुर थोर । मत्त दैत्यवर जाहलासे ॥२॥
आक्रमिली भूमि आक्रमिले स्वर्गा । थोर उपसर्गा देत आम्हां ॥३॥
विश्वकर्म्याची जे प्रेयसी दुहिता । बलात्कारे हर्ता तिचा होई ॥४॥
बलात्कारे भोगी दुर्वृत्त दानव । त्रिलोकी वैभव विस्तारिले ॥५॥
किती दिव्य कन्या तैशा मानुषीही । ठेवी कारागृही किती नारी ॥६॥
अवतार तुझा दैत्यांसी माराया । भूभार हराया कृष्णनाथा ॥७॥
आम्हां सोडवाया तरी धांव घेई । करुणापूर्ण होई आम्हांवरी ॥८॥
कुंडले आदितीची तेणे पळविली । थोर हानि केली असे नाथा ॥९॥
मणि-पर्वतासी हरोनि ठेविले । संकट ओढवले देवांलागी ॥१०॥
ऐसे विनवितां श्रीकृष्ण उठिले । इंद्रा आश्वासिले प्रेमभरे ॥११॥
मारीतो असुर निर्भय असावे । स्वर्गाप्रती जावे इंद्रा म्हणे ॥१२॥
ध्याईत गरुडा तंव तो सिद्ध असे । हात जोडितसे देवापुढे ॥१३॥
काय आज्ञा ऐसे म्हणतां कृष्णनाथ । आरुढे समर्थ तयावरी ॥१४॥
तंव सत्यभामा लाडकी भामिनी । पदर धरोनी हट्ट धरी ॥१५॥
सवे तीस घेत गरुडवाहन । क्षणांत गगन गांठीयेले ॥१६॥
येतां पुरापाशी मरु दैत्य थोर । महा धुरंधर प्रतिकारी ॥१७॥
पाश्यास्त्र शस्त्रांनी रक्षितसे वीर । तयिं यदुवीर झगटला ॥१८॥
सुदर्शन चक्रे शस्त्रें शमविली । दैत्ये निवटिली असंख्याते ॥१९॥
मरु आदिसर्व दैत्य संहारिले । नरका गांठिले कृष्णनाथे ॥२०॥
घनघोर युद्ध तयापाशी केले । असुर तोडिले कृष्णनाथे ॥२१॥
तयाचे तुकडे करी देवराव । हर्षताती देव स्वर्गामाजी ॥२२॥
तंव वसुंधरा तेथ प्रगटली । कुंडले दिधली आणवोनी ॥२३॥
वाराहावतारी तुझिया स्पर्शाने । गर्भ जो धारणे प्राप्त झाला ॥२४॥
तुझाच हा सुत तुवां मारियेला । भूभार हरीला कृष्णनाथा ॥२५॥
कृष्णचतुर्दशी कार्तिक महिना । असुर हनना केले देवा ॥२६॥
अरुणोदयासि मारिला असुर । तय देत वर कृष्णनाथ ॥२७॥
नीरांजन तेव्हा भव्य प्रज्वाळीले । अभ्यंग घातले कृष्णालागी ॥२८॥
तेव्हा पासोनियां तैलाभ्यंग स्नान । करिताती जन सौभाग्यार्थ ॥२९॥
लक्ष्मी प्राप्त होत वैभव बहुत । अलक्ष्मी नासत अभ्यंगाने ॥३०॥
अमावस्या दिनी प्रदोष पूजन । सौभाग्यावर्धन लक्ष्मीप्रिय ॥३१॥
अपमृत्युजाय यम न बाधत । दीप प्रज्वाळीत करावे ते ॥३२॥
आनंद उत्सव क्रीडन करावे । जीवा रमवावे परोपरी ॥३३॥
विनायक म्हणे सण दीपावली । कृष्ण वनमाली ध्यावा सदा ॥३४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 05, 2020
TOP