श्रीदत्त भजन गाथा - ईश्वराची भक्तांशी ऐक्यता
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
म्हणतोसी सदा भक्त मजप्रिय । वाहिले ह्रदय भक्तांलागी ॥१॥
भक्तांवीण माझा जीव कासाविस । पाहतां भक्तांस हर्ष मज ॥२॥
जेथे माझे भक्त तेथे मी बसतो । ताटांत जेवितो त्यांच्याच मी ॥३॥
त्यांचे पुढे निद्रा करितो प्रेमाने । आसने शयने आम्ही एक ॥४॥
भक्तांपाशी नाही मज दुजाभाव । सदा एकभाव मज भक्तां ॥५॥
भक्तांच्या सुखाने बोलतो जेवितो । श्रवण करितो त्यांच्या काने ॥६॥
भक्तनयनांनी जग हे पाहतो । भक्तरुप होतो समरस ॥७॥
भक्तइंद्रियांत माझा असे वास । त्यांचिया चित्तास बंध माझा ॥८॥
बुद्धि मन आणि इंद्रिये भक्तांची । तींच माझी साची जाणावी की ॥९॥
जो का अहंकार माझिये भक्तांचा । तोच असे साचा माझा जाणा ॥१०॥
नाही आम्हां कधी भिन्नत्व जाणावे । ऐक्यचि स्वभावे देवा-भक्तां ॥११॥
माझा मज नाही मुळि अभिमान। सकळ स्वाधीन भक्तांच्याच ॥१२॥
रक्षिन भक्तांसी प्रतिज्ञा साचार । असत्य निर्धार कधी नोहे ॥१३॥
माजे सुखदु:ख भक्तांचे आधीन । गेलो मी गोंवून भक्तांमाजि ॥१४॥
विनायक म्हाणे देवा तुझे बोल । न करी हे फ़ोल कृपाळुवा ॥१५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 07, 2020
TOP