मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
तमाशा

श्रीदत्त भजन गाथा - तमाशा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १३-३-१९३०
तमाशा हा आहे मांडिला वैर्‍यांनी । ओळख तूं मनी सुज्ञ मना ॥१॥
मायेचे हे बाळ जगताचे काळ । मांडियेला खेळ भुलवाया ॥२॥
काम सजविला नारी वेषधारी । हाव भाव तरी करी फ़ार ॥३॥
सकल शृंगार करुनि चवचाल । नटला बेताल मदन हा ॥४॥
वांकुड्या भृकुटी नेत्रांते मोडितो । संकेत दावितो सुरताचा ॥५॥
खुलावट मोठी ह्र्दय विधीतो । कानांत भरितो मृदु नाद ॥६॥
पदर सांवरी नर्तनाते करी । अंगुली अधरी धरीतसे ॥७॥
पदराने झांकी निजमुख क्षणे । मुरका मारी क्षणे खेळ करी ॥८॥
सजोनियां आला सर्व सोपस्कार । प्रेरित प्रखर दृष्टिबाण ॥९॥
मोह मृदुंगाते मृदुल वाजवी । डफ फ़डावी क्रोध बळे ॥१०॥
छुमछुम ध्वनी लोभ काढितसे । मने मोहितसे प्राणीयांची ॥११॥
तात्या बापु जाणा मदमत्सर हे । तमाशा हा पाहे रंगतसे ॥१२॥
तमाशांत रंगे जो का मूर्ख नर । रंगामाजी भर येवोनियां ॥१३॥
सर्वस्वाचा नाश होई मग त्याचा । होता तैसा साचा बोंबा मारी ॥१४॥
ठोकितो आरोळी सर्वस्व पेटतां । करित पूर्तता शिव्याश्रापे ॥१५॥
मम बीभत्साचा रस उदया येतो । अश्लील वदतो बहुपरी ॥१६॥
ऐसा हा शिमगा मूर्त बीभत्साचा । प्रतीक की साचा उभारत ॥१७॥
म्हणुनीयां मना विवेकाते धरी । ओळख अंतरी तमाशाते ॥१८॥
नारीनो हे आहे लबाडी ही सारी । लोभ तूं अंतरी धरुं नको ॥१९॥
आहे हा पुरुष तुज फ़सवितो । फ़जिती करितो ओळखरे ॥२०॥
फ़सवित तुज रुधिर प्राशित । राक्षस केवळ भयानक ॥२१॥
मोहक रुपासी भुलूं नको जीवा । आपुल्या स्वभावा प्रगटील ॥२२॥
पिउनियां रक्त शुष्क तो करिल । मग तो हाणिल लत्ता शिरी ॥२३॥
अवघे हे खेळी कामाचे सांगाती । शरीर भक्षिती तुझे नरा ॥२४॥
गिधाडे ही शुद्ध मांस भक्षक हे । दैत्य ओळख हे काकदृष्टी ॥२५॥
नादीं भरुं नको नको हा तमाशा । सोडी हे दुराशा कामस्त्रीची ॥२६॥
तम म्हणिजे ते अज्ञान जाणिजे । कशाला सेविजे तदाशेते ॥२७॥
अज्ञानाची आशा सोडुनीयां देई । जागा तूं रे होई सोडी निद्रा ॥२८॥
मोहाला तूं बळी नको पडूं नरा । विवेक दृष्टी जरा उघडी तूं ॥२९॥
भौतिक हे नेत्र सगुणी भूलती । सृष्टींत रमती देखणेपणी ॥३०॥
परी शिवाचा तो तृतीय नयन । विवेक जो ज्ञानरुप आहे ॥३१॥
तोच उघडुनी जरी पहाशील । भस्म करशील मदनात ॥३२॥
जळेल तो डफ़ जळेल मृदुंग । होय रसभंग खेळीयांचा ॥३३॥
पळतील सारे होय विटंबणा । मदनदहना साधितांची ॥३४॥
हरपेल क्रोध लोभ तो गळत । मोह शुष्क होत एकसरे ॥३५॥
मदमत्सर हे पळोनी निघती । पळोनियां जाती दूरवरी ॥३६॥
ऐसा करी नरा शिमगा तयांचा । तमाशा दावी साचा जनालागी ॥३७॥
विवेक दृष्टीचे सामर्थ्य दावावे । तुवां प्रगटवावे सक्रिय की ॥३८॥
विनायक म्हणे बोंबाबोंब करा । मदनासी थारा देऊं नका ॥३९॥
==
तमाशा
खेळ शिमग्याचा पहा । सावध अंतरांत रहा ॥१॥
रंगु नको त्या खेळांत । पडूं नको त्या मोहांत ॥२॥
जागेपणी खेळ पहा । ओळख अनर्थ हा महा ॥३॥
कैशापरी सजतसे । तुजपुढे जाचतसे ॥४॥
हावभाव कैसे दावी । कैसे तुजला फ़सवी ॥५॥
खोटा करुनि हा खेळ । मूर्त राक्षस केवळ ॥६॥
आला भक्षाया तुजसीं । ओळखावे तरी त्यासी ॥७॥
अवघे त्याचे हे सोंगडी । घालती पहा कैसी फ़ुगडी ॥८॥
तूज धराया पातले । तूज भक्षाया टपले ॥९॥
मान तूझी मोडतील । मांस तूझे भक्षितील ॥१०॥
राहूनी जागा तूं मानवा । पेटवी रे तूं वणवा ॥११॥
तृतीय नेत्र तूं उघडी । अग्निस्फ़ुलिंगांते पाडी ॥१२॥
एकसरे भस्म होती । कैसे पहा तडफ़डती ॥१३॥
पेटवी रे होमकुंड । जाळी जाळी जाळी भंड ॥१४॥
ऐसा करी तूं तमाशा । त्यांचाच की तुं रे देख ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP