मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
अहं दत्तोऽस्मि

श्रीदत्त भजन गाथा - अहं दत्तोऽस्मि

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता.४/७/१९२९
माझेवरी करी अमृत-सिंचन । माझा दयाघन दत्तनाथ ॥१॥
त्याच्या सम तोच प्रेमाचा सागर । तोच करुणाकर एक जाण ॥२॥
काय सांगूं त्याचे वात्सल्य मी वाचे । भरुनि येई साचें ह्रदय माझे ॥३॥
कण्ठ सद्गदित नयनि बाष्प येत । अंग पुलंकांकित होय माझे ॥४॥
काय देवा तुज म्हणुं आतां सांग । माझे अंतरंग भरलेसे ॥५॥
मी तो काय माझा काय बडिवार । सांग गुरुवर मजलागी ॥६॥
तुझा महिमा थोर तुलाच साजती । तुज शोभा देतो परमचि ॥७॥
धन्य तुझे नाम धन्य तुझी किर्ति । त्रिभुवनपति तूंच धन्य ॥८॥
आनंदे डुलतों किती सुखावतो । एकरुपहोतो तुझे ठायी ॥९॥
भरलासी माझ्या अंगि दत्तदेवा । मज सौख्य ठेवा झाला सिद्ध ॥१०॥
जेवलो मी तृप्त झालो दत्तराया । अमृताची धाया मज येत ॥११॥
अमृताचे स्नान अमृताचे पान । अमृत भोजन मज झाले ॥१२॥
आनंदाचा मद मजला माजवी म। निजठायी रमवी किती तरी ॥१३॥
रसी रस झालो बनलो रसरुप । झालो मी निष्पाप निरहंकृति ॥१४॥
मजजवळि ते न पाप आतां राहे । शुद्धताच पाहे मजपाशी ॥१५॥
मी तो पुण्याईचा असे की सागर । माझे भाग्य थोर त्रिभुवनी ॥१६॥
सकळांसी पुज्य मज बनविले । मज पूजार्ह केले अधिवेशन ॥१८॥
दत्तरुप सदा जगी मी वर्तेन । मुक्त मी असेन अनिर्बंध ॥१९॥
माझ्या दर्शनाने पातकी पुनीत । होतीलो निश्चित जाणावे की ॥२०॥
धन्यवाद माझा मीच गात असे । माझा बोलतसे गुरुनाथ ॥२१॥
सकलांचे काम पुरविन समर्थ । सुलभ परमार्थ करीन मी ॥२२॥
परमार्थाची वाट दाविन जनांलागी । तारीन मी अंगी पतिताला ॥२३॥
माझे हे वैभव माझा हा प्रभाव । बोले दत्तदेव निजवाचे ॥२४॥
विनायक बोले मीच दत्तात्रेय । जाणा नि:संशय शंका नाही ॥२५॥
==
गुरुवार ता. ११/७/२९
पातक कैसे माझे नाथा । तुझे नाम घेता समर्था ॥१॥
अग्नि न जाळी कापसाला । आज देखिले नवलाला ॥२॥
काजव्यानी सूर्यालागी । भक्षिले वाटे आज जगी ॥३॥
तुझे नाम अपयश । पावले की जगदीश ॥४॥
टिटवीने सागराला । केले शुष्क वाटे मजला ॥५॥
तुझ्या नामाचे वैभव । धरी कैसे अस्तभव ॥६॥
प्रभावशाली तुझे नाम । विजयाचे पूर्ण धाम ॥७॥
तेजोराशि जे परम । केवळ अमृताचे धाम ॥८॥
आज काय झाले त्यासी । न कळे मम मनासी ॥९॥
विनायक विनवीतो । चरणि शिर हे ठेवितो ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP