श्रीदत्त भजन गाथा - गंगावतरण
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
आली आली गंगा आली । पावन ती करित भली ॥१॥
सहस्त्र मार्गी येत आहे । प्रेमे उडी घालिताहे ॥२॥
आम्हांसाठी आली आली । स्वर्गांतूनी उतरली ॥३॥
परम उताविळ झाली । आम्हांसाठी कळवळली ॥४॥
आम्हांलागी तारायाते । जन्म मृत्यु हरायाते ॥५॥
पाप आमुचे नासायासी । स्वच्छ आम्हां करायासी ॥६॥
आलि आलि माउली हे । कृपेने भरली आहे ॥७॥
आम्हां स्नान घालायासी । दर्शन आम्हां द्यावयासी ॥८॥
स्पर्श आम्हां करायासी । कृपादृष्टी पहायासी ॥९॥
पाप ताप दैन्य सारे । हरायाते अवतरे ॥१०॥
आम्हांसाठी हरिपद । त्यजुनि येत ती वरद ॥११॥
लघु करी कैलासाते । न लोभे शिव प्रेमाते ॥१२॥
जटावास त्यागोनियां । स्वर्ग तुच्छ करोनियां ॥१३॥
देवलोक ती त्यजोनी । आम्हांसाठी ये धांवोनी ॥१४॥
आलि आलि माता आली । सकल पुण्ये प्रगटली ॥१५॥
मृत्युलोकी घुसतसे । आम्हांलागी शोधितसे ॥१६॥
जीव जंतु खडे धोंडे । पावन करीतसे गाढे ॥१७॥
मृत्युलोक उद्धरीत । येथे असे ही वर्तत ॥१८॥
पाताळी ही उडी घेई । जीवमात्रांची हे आई ॥१९॥
स्वर्ग मृत्यु पाताळांत । असे जाणा संचरत ॥२०॥
देव नर तिर्यचांसी । सकळां शुद्ध करायासी ॥२१॥
झटतसे रात्रंदिन । करी पाप-प्रक्षालन ॥२२॥
हतपतित तारणासी । केले बद्ध परिकरासी ॥२३॥
विनायक म्हणे स्मरा । मातोश्रीलागी आदरा ॥२४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 16, 2020
TOP