मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
विश्वामित्र मख रक्षण

श्रीदत्त भजन गाथा - विश्वामित्र मख रक्षण

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. ३-४-१९३०
सिद्धाश्रम पद-वैभवासी देवा । येथे प्रगटावा दयानिधे ॥१॥
लोकसंग्रहार्थ धर्मस्थापनार्थ । प्रगट अत्यर्थ स्थान ठेवा ॥२॥
कलियुगी घोर पातकी प्रवृत्ति । बहुत आपत्ति ओढवती ॥३॥
उपासनामख रक्षाया कारण । करी चापबाण घ्यावे नाथा ॥४॥
ताटका हे माया ईचे पुत्रबळी । माजविती कळी थोर येथे ॥५॥
मारीच सुबाहु मदमत्सर हे । आम्हांसी विग्रहे पीडा देती ॥६॥
अनुष्ठान सिद्ध न व्हाया कारण । विघ्नाते दारुण आणिताती ॥७॥
विघ्वंसिती यज्ञ मायेचे कुमार । साहवेना मार यांचा आम्हां ॥८॥
नसतीच कळ पाठीसी लाविती । चिंतेत ठेविती सदा आम्हां ॥९॥
प्रेम विभांडीती भजन मोडीती । सेवा करुं न देती तूझी देवा ॥१०॥
महामाया घोर राक्षसी ताटका । तुझीये भजकां भेडसाविते ॥११॥
पुलस्ति वंशभूत विश्रवसाचा सुत । वैश्रवण-भ्रात रावण जो ॥१२॥
सहोदर त्याचा नामे कुंभकर्ण । राक्षस दारुण काम क्रोध ॥१३॥
आम्हां बाधताती आम्ही निरुपाय । धरियेले पाय तुझे दत्ता ॥१४॥
विनायक म्हणे उपासना धर्म । रक्षी पुरुषोत्तम कृपा करी ॥१५॥
==
विश्वामित्र-मख-रक्षण
मखरक्षणासी गाधिचा तनय । शरण तुम्हां होय जगद्वन्द्य ॥१॥
तुमचा अवतार दशरथवंशी । वार्ता ऐके ऐशी कौशिक तो ॥२॥
अयोध्येसी जाय भेटे दशरथा । आपुलिया अर्था सांगतसे ॥३॥
तुझा पुत्र राम मखरक्षणासी । आलो मागायासी म्हणे विप्र ॥४॥
अवतार आहे विष्णुचा हा राम । आला पूर्णकाम धर्मासाठी ॥५॥
यज्ञ याग कर्म रक्षण कराया । धर्माते स्थापाया देव आला ॥६॥
म्हणोनि मागणी घालितो रामासी । मख रक्षायासी देई नृपा ॥७॥
ऐसे मागोनिया रामलक्षुमण । यज्ञाचे कारण नेत असे ॥८॥
ताटिकेचा वध साधाया कारण । शिरत आपण तिचे वनीं ॥९॥
राम हस्ते केला वध त्या दुष्टेचा । कार्यभाग साचा साधियेला ॥१०॥
सिद्धाश्रमी नेत रामलक्षुमण । हातीचाप बाण देत त्यांच्या ॥११॥
सहा दिवसांचे माडी अनुष्ठान । धरोनियां मौन कौशिक तो ॥१२॥
रामलक्षुमण करिती पहारा । सिद्ध निशाचरां वधावया ॥१३॥
सहावे दिवशी जेव्हा अग्नि प्रज्वाळीले । राक्षस लोटिले एकसरे ॥१४॥
रुधिराचि वृष्टी यज्ञांत करिती । शिळा फ़ेकिताती घाणवस्तु ॥१५॥
मानवास्त्रे राम मारीचा उडवी । समुद्री बुडवी तयालागी ॥१६॥
अग्न्यस्त्राने जाळी सुबाहु राक्षस । बायवीयास्त्रास प्रेरी तरी ॥१७॥
नि:शेष तेव्हां केले घोर निशाचर । अनुष्ठान थोर सिद्ध झाले ॥१८॥
विश्वामित्र मख रक्षणाकारण । सिद्ध देवा आपण झालां जैसे ॥१९॥
याही स्थानासाठी तैसे सिद्ध व्हावे । भजन करावे सिद्ध येथे ॥२०॥
विनायक म्हणे करा सिद्धस्थान । आपण प्रगटून येथे देवा ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP