श्रीदत्त भजन गाथा - स्खलनशीलता
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. ९-१०-१९३०
चुकतो आम्ही किती नाही तया मिती । होईना गणती अपराधां ॥१॥
पाउलोपाउली दोषार्ह वर्तन । येतसे घडोन किती सांगू ॥२॥
जरी देह नीट ठेविला जपोनी । मन अडमडोनी दोष करि ॥३॥
देह आणि मन जरी सांभाळीली । वाणी मस्ती भली करीतसे ॥४॥
देह वाणी मन यांसी साभाळितां । कष्ट अवधूता अगणित ॥५॥
किती अवधान ठेवावे जरी तरी । भूल अवसरी पडतसे ॥६॥
कोठे तरी जाते संधान आपुले । उपाय न चले येथ कांही ॥७॥
विनायक म्हणे ठक कैशी पडे । निदान न सांपडे कोणालाही ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2020
TOP