श्रीदत्त भजन गाथा - पितृत्वाचे कारण
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
अनंत तुझ्या मूर्ति जगांत वसती । नानाकार स्थिति वर्तताती ॥१॥
संरक्षण हाच मुख्य असे धर्म । पालन हे कर्म असे सदा ॥२॥
तूंच अन्नमय तूंच जलमय । तूंच वायुमय दत्तनाथा ॥३॥
धारण जगताचे सकल तुझेनी । काय मी वाचेनी बोलूं सांग ॥४॥
तूंच बीजप्रद अससी बा पिता । सर्व दु:खहर्ता तूंच जाण ॥५॥
औषधिरुपाने तूंच गा वर्तसी । सकळां पोषिसी तूंच दत्ता "॥६॥
देहसौकुमार्य तुझ्याच कृपेने । प्राप्त होय जाणे सकलांसी ॥७॥
आमुचा तारक तूंच एक नाथा । पुरविसी अर्था तूंच जाण ॥८॥
पाठीसीं तूं उभा कोणत्याही रुपे । तुझिया प्रतापे सदवन ॥९॥
जे जे कांही जाण सृष्टींत पोषक । तुझेच रुपक सर्व दत्ता ॥१०॥
जे जे कांही भोग सकल तूंच नाथा । म्हणोनी समर्था पिताजी तूं ॥११॥
तूंच विद्यादाता संस्काराचा कर्ता । तूंच होसी देता सर्व कांही ॥१२॥
विनायक म्हणे नाते पिताजीचे । तुझे ठायी साचे असे जाण ॥१३॥
==
पितृत्वाचे कारण
ब्रह्मदेवा ज्ञान प्रथम तुवां दिले । तेच पसरीले जगत्रयी ॥१॥
आमुच्या चित्तांत ज्ञान जे स्फ़ुरत । तूंच जाणा देत आम्हांलागी ॥२॥
जो का मंत्र स्फ़ुरे आमुच्या चित्तांत । आचरण होत ज्याच्यापरी ॥३॥
तूंच मंत्रदाता तूंच जगद्गुरु । तूंच साक्षात्कारु पिताजी की ॥४॥
आमुच्या देहाची जतना जे झाली । तारक शक्ती भली तुझीच की ॥५॥
तूंच जाण नाथा आमुच्या देहाचा । उपजविता साचा जनक तूं ॥६॥
विनायक म्हणे पिता पालयिता । तूंच जाण धाता विश्वगुरु ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2020
TOP