मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
दु:ख

श्रीदत्त भजन गाथा - दु:ख

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. २४-७-१९३०

दु:ख हे अमृत दु:ख हाचि स्वर्ग । दु:ख अपवर्ग मुख्य़ जाणा ॥१॥
करुणेची योनि भक्तीचा उगम । वैराग्य परम दु:खमूळ ॥२॥
दु:ख भेटवीत जाणा परमात्म्यासी । दु:ख शोधनासीं करीतसे ॥३॥
दु:खासम नाही भवासी औषधि । तुटवी उपाधि दु:ख जाणा ॥४॥
दु:ख करीतसे नरा धैर्यवंत । होय भाग्यवंत दु:खयोगे ॥५॥
परम ऐश्वर्याचे दु:ख हेचि मूळ । पुण्याईचे फ़ळ दु:ख जाणान ॥६॥
दु:ख हाचि मित्र सखा की सोयरा । दु:ख हा आसरा सज्जनांचा ॥७॥
इहपर दु:ख देतसे सद्गति । दु:खासी श्रीपति संलग्न की ॥८॥
दु:ख झगटतां देवस्पर्श लाभे । द्यावे पद्मनाभें दु:ख सदा ॥९॥
दु:ख हे जननी जाणा परमार्थाची । सोयरीक साची घडे ब्रह्मी ॥१०॥
विनायक म्हणे दु:खचि मागावे । सदा प्रेम भावे देवापाशी ॥११॥
==
आंच लागत दु:खाची । स्मरणी होत ईश्वराची ॥१॥
जैसे जैसे ह्रदय उले । तो तो भक्तिरसे खुले ॥२॥
तो तो आळवित देवा । पावतसे भक्तिभावा ॥३॥
कवित्वाची होत स्फ़ूर्ति । करुणेचे शब्द निघती ॥४॥
भजन घडत नियमाने । करी सेवत तोखाने ॥५॥
नास्तिकपण लया जाई । श्रद्धा उद्भुत की होई ॥६॥
दु:ख नेत देवापाशी । घडवी त्याच्या दर्शनासी ॥७॥
देव पुढे उभा करी । दु:ख जाणा निरंतरी ॥८॥
हंसवी खेळवी बोलवी । देवापुढे दु:ख नाचवी ॥९॥
ह्रदयांत प्रकाशवी । देवमूर्ति जाणा बरवी ॥१०॥
देव दु:खे हाता येतो । दर्शनाचा लाभ होतो ॥११॥
मोक्षद गुरु परमात्मा । दु:ख दावी जगदात्मा ॥१२॥
खरा खरा दुखवला । तोच देवासी भेटला ॥१३॥
दु:ख हेच कामधेनू । काय यश त्यांचे वानूं ॥१४॥
पश्चाताप होतां चित्तां । संसारासी मारी लत्ता ॥१५॥
भीती जाई मुळीहुनी । धीट राहत होवोनी ॥१६॥
विनायक म्हणे देवा । मज दु:खी सदा ठेवा ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP