मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
ईश्वर आणि भक्त

श्रीदत्त भजन गाथा - ईश्वर आणि भक्त

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. २०-३-१९३०
प्राणाहुनी प्रिय भक्त ईश्वरासी । निजांगे कार्यासी साधीतसे ॥१॥
कौतुक तयांचे तयाला बहुत । काया श्रमवित त्यांचेसाठी ॥२॥
भक्त भजनाते करिती प्रेमाने । आपण तोखाने नाचतसे ॥३॥
रंग भरवित स्तुति वदवीत । प्रेम स्फ़ुरवीत मूर्तरुपे ॥४॥
कौतुक तयाला स्तुति गायकांचे । आपुलीया वाचे वदतसे ।
ताल धरीतसे साथ करीतसे । चोज मांडितसे कवित्वाचे ॥६॥
वाहवा म्हणतसे स्वये रंगतसे । पाठी उभा असे भक्ताचीया ॥७॥
विनायक म्हणे भक्तापाशी वास । पसंत तयास बहु वाटे ॥८॥
==
ईश्वर आणि भक्त
भक्त पूजा करीत या ईश्वराची । पूर्ती साधनांची तोच करी ॥१॥
पत्र पुष्प फ़ळ आपण आणीतो । स्वये उगाळीतो चंदनासी ॥२॥
आपुली आपण पूजा करवोन । घेत दयाघन भक्ता हाती ॥३॥
आपण शृंगार सुंदर करावी । भक्तासी रंजवी दयाळु तो ॥४॥
जैसे भक्तमन तैसा तो नटतो । बहु संतोषतो भक्तासवे ॥५॥
भक्त सेवा करी प्रेमाने देवाची । देव करी त्याची अहर्निश ॥६॥
साउलीसम उभा तयाचे पाठीसीं । भक्ताचे सेवेसी सादर तो ॥७॥
पाणी भरीतसे उष्टीं काढीतसे । अन्न शिजवीतसे जगत्प्रभु ॥८॥
खेळवी मुलेबाळे काढीत वेटाळी । भक्ता कदाकाळी विसंबेना ॥९॥
रोगभोग होता शुश्रुषेते करी । अकृत्यही सारी कृत्य देव ॥१०॥
मलिन वस्त्रे त्याचीं स्वये धुवीतसे । भोग काढीतसे त्याचा स्वये ॥११॥
तया भरवीतो औषधे पाजितो । आरोग्याते देतो स्वये देव ॥१२॥
वाटेल ती सेवा करितो आपण । परि गुप्तपण राखीतसे ॥१३॥
समजुं न देतां भक्तांसी सेवितो । आपण काढितो कष्ट त्याचे ॥१४॥
विनायक म्हणे कृपाळू तो देव । अपुले वैभव विसरतो ॥१५॥
==
ईश्वर आणि भक्त
आम्हांपाशी देव आम्ही देवापाशी । कधी वियोगासी पडो नेदी ॥१॥
जेथे तेथे आहे उभा नारायण । त्याचे सिद्धपण सर्वदाचे ॥२॥
कदा विसंबेना दूर तो होईना । दृष्टी आड करिना कधी भक्तां ॥३॥
जैसे चित्त निज बालकी मातेचे त्याहूनीयां साचे त्याचे असे ॥४॥
लाड पुरवाया सदा तो सादर । त्याचा चमत्कार वंदू काय ॥५॥
आम्ही लडिवाळ त्याच्या जिव्हाळ्याचे । परम प्रेमाचे आम्ही त्यासी ॥६॥
आम्हांवरी कृपा दया क्षमा थोर । कोप आम्हांवर कदा नसे ॥७॥
चुकलो आम्ही जरी करीतसे चोज । तया नाही लाज प्रेमास्तव ॥८॥
आमुचा विकला गुलाम बनला । आमुच्या हौसेला पूर्ण करी ॥९॥
जे जे मनी येते ते ते पुरवीतो । आम्हांसी पोषितो सर्वपरी ॥१०॥
विनायक म्हणे देव जिवलग । त्याची लगबग आम्हांसाठी ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP