मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
योगाभ्यास

श्रीदत्त भजन गाथा - योगाभ्यास

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


योगाभ्यास
नित्य आनंदाचा साधावा हा योग । ध्यावा रमारंग ह्रदयांत ॥१॥
सुंदर ती मूर्ति नेत्र मनोहर । ह्रदयांत स्थिर करावी ती ॥२॥
जाऊं न द्यावे मन मुळींच बाहेरी । चरणां माझारी ठेवी सदा ॥३॥
मृदुल चरणे निजशिरी घेई । समरस होई तयांमधी ॥४॥
ह्रदयकमळी ध्याई तूं ती भली । जडवावी भली चित्तवृत्ति ॥५॥
जैशी घोरपड तटा चिकटत । कधी न सुटत कांही केल्या ॥६॥
तैशी चित्तवृत्ति जडवी हरीपायी । दृढ ती उपायी करी नित्य ॥७॥
विनायक म्हणे हाच योगाभ्यास । धरा निरोधास वृत्तिमाजी ॥८॥
==
योगाभ्यास
पान भोजन हे जाणा अमृताचे । गुणवाद साचे देवाजीचे ॥१॥
देवाचे स्वरुप देवाचे सुयश । सदा अहर्निश ठेवी मनी ॥२॥
अन्य सर्व लाभ तूच नावडावे । देवाते स्मरावे जीवे भावे ॥३॥
देवासी बोलावे देवासी सांगावे । देवासी पूजावे सर्वकाळ ॥४॥
अशन शयन सदा देवापाशी । गुज देवापाशी असावे की ॥५॥
देवापाशी गोष्टी हांसणे खेळणे । आनंदे नाचणे देवापाशी ॥६॥
लोळणे देवावरी देवासी हुंगणे । देवासी सांगणे सर्वकाही ॥७॥
देवा बिलगणे देवा न सोडणे । वांकुल्या दावणे देवालागी ॥८॥
विनायक म्हणे योग सलगीचा । नित्य असे साचा ऐसाच की ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP