श्रीदत्त भजन गाथा - विनायकाचे कोडे
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. १७-७-१९३०
सेवियेला जरी गुरु कल्पतरु । मन्मनीचा भारु कां न हरी ॥१॥
जडत्व मनाचे कां ते हरपेना । विषण्णता जाईना अजुनि कां ॥२॥
कां न होय माझे प्रसन्न हे मन। राहत कां खिन्न सर्वदा ते ॥३॥
जरी गुण गाते गुरुपदां ध्याते । गुरुला भजते विश्वासाने ॥४॥
जरी सार्वकाळ रत गुरुपदी । पडे कां विपदीं चिंतेच्या ते ॥५॥
चिंता कां तयासी अजुनी बाधते । अपूर्ण राहते मनोवाच्छा ॥६॥
कैसे पूर्ण होय न ते मनोगत । कां न अवधूत कृपा करी ॥७॥
आतुर्बळी जो कां सर्वदा समर्थ । पुरवी तो अर्थ स्वकीयांचे ॥७॥
कां न मजला तो पावे दत्तात्रेय । प्रसन्न न होय अजुनी कां ॥८॥
विनायक म्हणे कोडे हे मजला । श्रीगुरु दयाळा सोडवावे ॥१०॥
==
धांवा
धरियेला विश्वास बांधियेली गाठ । फ़िरवीली पाठ जगतासी ॥१॥
धरियेले पाय सेवीत राहिलो । बहु विश्वासलो गुरुवरी ॥२॥
तारक ही माय तारील मजला । तिचीया कृपेला सीमा नाही ॥३॥
कधि न करील त्याग ही माउली । पाखर की ओली तिची सदा ॥४॥
करुणेने आर्द्र परम कोमल । दयाच केवळ गुरुमाता ॥५॥
ऐसीया बुद्धिने आश्रय मी केला । इतर सांडीला व्यवसाय ॥६॥
निर्धाराने झालो पदी शरणागत । येईल धांवत माय माझी ॥७॥
अपेक्षा करीत राहिलो आजवरी । कां न येई तरी अजुनीयां ॥८॥
किती वाट पाहूं वेळ फ़ार झाला । तळमळ जीवाला थोर झाली ॥९॥
आशेची तूं करुं नको गे निराशा । भक्तां तूं सुवशा कीर्ति तुझी ॥१०॥
तरी लगबग करी तूं ग माये । करुणा-ह्रदये धांव आतां ॥११॥
नैराश्यात नको मजलागी लोटूं । किती मी झगटूं नैराश्यासी ॥१२॥
विनायक आतां अनुग्रही माये । कृपा न समाये तुझे ठायी ॥१३॥
==
धांवा
येई येई आतां लवकरी येई । मजसाठी घेई उडी माये ॥१॥
किती आशा धरुं किती वाट पाहूं । किती वेग साहूं नैराश्याचे ॥२॥
करपले माझे ह्रदय निराशेने । किती मी इच्छेने पाहूं वाट ॥३॥
इच्छा हे पोळली जणुं दग्ध झाली । अजुनी न भली करुणा ये ॥४॥
ऐकियेली श्रुति ऐकियेली स्मृति । संताचिया उक्ती ऐकियेल्या ॥५॥
ऐकिली पुराणे ऐकिले इतिहास । किती दंतकथांस ऐकियेले ॥६॥
विश्वास ठेवोनी दृढ मी राहिलो । फ़जीत पावलो आतां वाटे ॥७॥
कितीतरी ग्वाही केली त्वद्यशाची । विफ़ल ती साची जणुं झाली ॥८॥
गेली माझी पत लाज हरपली । लाज मज झाली किती सांगू ॥९॥
माझ्या विश्वासाचे होय की मातेरे । ऐसे गुरुवरे काय केले ॥१०॥
काय आले मना सांगा गुरुनाथा । पदांवरी माथा ठेवियेला ॥११॥
बोला बोला बोला बोला गुरुनाथ । आतां महाराज सांगा कांही ॥१२३॥
काय मेळविले तुमच्या सेवेने । वर्णावे तोकाने काय सांगा ॥१३॥
कृतज्ञता भाव धरावा कशाचा । पुरला न साचा मनोरथ ॥१४॥
देह श्रमविला धरोनियां आस । पावशील खास कृपावंता ॥१५॥
गुरुसेवा कधी मुळी न व्यर्थ होय । सिद्धीस की जाय मनोरथ ॥१६॥
परि अनुभव विपरीत आला । दोहोंसी फ़सला तुझा दास ॥१७॥
नाही स्वार्थ नाही परमार्थ साधला । पात्र नाही झाला त्वकृपेला ॥१८॥
ऐशी कैशी हानि आली या मजसी । सांगावे कृपेसी गुरुनाथा ॥१९॥
चित्त घाबरले ह्रदय पीडले । कांही न सुचे भले मज आतां ॥२०॥
तुझे तूंच पाहे सकळ गुरुनाथा । कळविले अर्था ह्रदयींच्या ॥२१॥
तुझा तुज असो देवा अभिमान । ब्रीदाचे अवन करी आतां ॥२२॥
विनायक म्हणे सर्व सोपवीतो । तुझे ठायी ठेवितो निजमन ॥२३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 16, 2020
TOP