मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
जगत्पिता

श्रीदत्त भजन गाथा - जगत्पिता

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. ११-९-१९३०

जगाचा तूं बाप परम स्नेहाळ । प्रेमचि केवळ मूर्तिमंत ॥१॥
पिता तूंच जाण सकळ सृष्टीचा । चराचर विश्वाचा जनक तूं ॥२॥
तूंच एक जाण सृष्टी-प्रतिपाळीता । अवन-पूर्तता तुझेपाशी ॥३॥
जे जे कांही होत अवन जगांत । सकळ करीत तूंच नाथा ॥४॥
लालन पालन सकल जगाचे । करिशी तूंच साचे विश्वंभरा ॥५॥
तूंच मेघ होसी जल तूं वर्षिसी । तूंच पिकविसी धान्य सारे ॥६॥
तूंच धान्यरुपे देहाते पोषिसी । तूंच एक होसी पिता देहा ॥७॥
तूंच इंद्र होसी मेघांचा शासिता । तूंच अन्नदाता सकलांचा ॥८॥
तुझेपसोनियां पोषण जगाचे । साधन स्थितिचे तूंच नाथा ॥९॥
विनायक म्हणे मूर्तिमंत स्थिती । तूंच गा श्रीपती जगत्रयी ॥१०॥
==
जगत्पिता

सुर्यकिरणांत वसोनी रक्षिसी । प्राणांते पोषिसी विश्वाच्या तूं ॥१॥
प्राणांचा तूं पिता तूंच स्थितिकर्ता । तूंच जगद्भर्ता सूर्यरुप ॥२॥
सूर्यरुपे जरी गगनी राहासी । जग हे व्यापिसी किरणांनी ॥३॥
तोच अनुग्रह थोर जगा होत । चैतन्य प्रकाशत त्याच्या योगे ॥४॥
विनायक म्हणे सूर्य-देव पिता । सकळां रक्षिता आदित्य तो ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP