श्रीदत्त भजन गाथा - वसंतश्री
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. २२-५-१९३०
सह्यगिरीवरी रम्यशिळेवरी । बैसले मुरारी निजानन्दे ॥१॥
मन्दमन्द वारा वाहे झुळझुळ । बहुत शीतळ सिन्धुजळे ॥२॥
औदुंबरवृक्ष वरी करी छाया । देवाते सेवाया विनयाने ॥३॥
पुष्पलता पुष्पे वरोनि वर्षती । कुहुकुहु गाती परभृत ॥४॥
वनमाळा कंठी प्रेमाने घालिती । अमर युवती आनंदाने ॥५॥
चंदनादि वृक्ष गंध पसरिती । पक्षीगण गाती वृक्षावरी ॥६॥
पुष्प-रस वृक्ष देवावरी गाळिती । मधुर अर्पिती फ़ळे देवा ॥७॥
वसंताने असे बहर मांडिला । गिरी गजबजला फ़ळे पुष्पे ॥८॥
पश्चिम सागर गर्जे हळूहळू । वीचि-फ़ेन-धवलू प्रसन्न तो ॥९॥
शीतल तुषार स्पर्शवी देवासी । करित सेवेसी पश्चिमाब्धि ॥१०॥
शेष धरी फ़णा देवाचिये शिरी । नेत्र चमकवी रत्नांसम ॥११॥
सहस्त्रमणी शिरी तेजे तळपती । शोभा तरी किती वर्णावी ती ॥१२॥
विनायक म्हणे वसंत समय । अत्रिचा तनय शोभवितो ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 16, 2020
TOP