श्रीदत्त भजन गाथा - ये यथा मां प्रपद्यन्ते
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. १६-१-१९३०
ज्याचेपाशी प्रेमा भेटे त्यासी देव । येथे शुद्ध भाव पाहिजे की ॥१॥
भावनेसम देव , सगुण भावनेचे । रुप असे साचे त्या देवा ॥२॥
प्रेममय पाहे तया प्रेमरुप । हरितसे ताप कृपादृष्टी ॥३॥
भयस्थान पाहे जो का देवापाशी । भयंकर त्यासी देव आहे ॥४॥
शत्रुभावे पाहे शत्रु त्यासी देव । नास्तिका अभाव दिसे त्याचा ॥५॥
जैसी जैसी ज्याची भावना होतसी । देव नटतसे तैसा तैसा ॥६॥
होई सुत कोणा होई पिता कोणा । होय माता कोणा जगद्वन्द्य ॥७॥
होय कोणा भाऊ कोणाची भगिनी । कोणाची कामिनी होत देव ॥८॥
होत जार कोणा कोणासी सोंगडी । कोणा वीर गडी माधव हा ॥९॥
कोणाचा चाकर कोणा यजमान । होत भगवान स्वये जाणा ॥१०॥
कोणाची तो वैश्या कोणा खाद्यपेय । देव स्वये होय कृपाळुत्वे ॥११॥
देव होय राजा पृथवीचा पति । होय सुरपति विश्वंभर ॥१२॥
देवासम देव त्याचा सदा भाव । जैसा भक्तीभाव तैसा असे ॥१३॥
म्हणुनीयां भजा भजा सर्वेश्वर । अर्पोनि अंतर तयालागी ॥१४॥
विनायक म्हणे देव हा भावाचा । देव हा भल्याचा भला देव ॥१५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 06, 2020
TOP