श्रीदत्त भजन गाथा - श्रीगुरुंचा आशीर्वाद
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता.२५-१२-१९३०
शुभ आशीर्वाद सकळां सेवकां । पूजकां भजकां कल्याणाचा ॥१॥
ज्यांनी ज्यांनी केली भक्तीभावे सेवा । मज मनोभावा अर्पोनीयां ॥२॥
मान अपमान मनासी नाणिले । संशय धरिले नाही ज्यांनी ॥३॥
कर्तव्य म्हणोनी सेविले मजला । धरोनी प्रेमाला दृढ मनी ॥४॥
ज्यांनी माझेवरी विश्वास ठेविला । नाहीच दाविला अनादर ॥५॥
पत्र पुष्प फ़ल मजला अर्पिले । आह्य ज्यांनी केले माझ्या कार्या ॥६॥
त्यांचे मनोरथ होती खास पूर्ण । त्यासी नारायण सहाय मी ॥७॥
जेव्हा जेव्हा कांही पडेल जड भारी । स्मरतां अंतरी प्रगटेन ॥८॥
रक्षिन भक्तांसी राखीन मी ब्रीद । सदा मी वरद निज दासां ॥९॥
स्मरण माझे ठेवा मज भजा पूजा । साधीन मी काजा तुमचीया ॥१०॥
संशय मनांत नका कांही धरुं । नका अविचारु करुं कांही ॥११॥
मी तो वर्ततसे सदा भक्तांपाशी । माझीया वचनासी सत्य माना ॥१२॥
अखंड स्मरण भजन पूजन । लावोनियां मन सदा करा ॥१३॥
करा गुरुवार उपवास जाग्रण । माझे नामस्मरण प्रेमभरे ॥१४॥
जो का कार्यक्रम स्थानी या चालत । तोच आचरत रहा सदा ॥१५॥
तेणे कार्यसिद्धि पुरेल वासना । हरतील नाना आपदा ज्या ॥१६॥
माझ्या भक्तांलागी सुखी मी ठेवीन । कधी न विसंबेन क्षणमात्र ॥१७॥
विनायक म्हणे ऐसा आशीर्वाद । देती गुरु वरद उपासकां ॥१८॥
N/A
References : N/A
Last Updated : January 20, 2020
TOP