आतां संक्षेपानें गोत्रप्रवरनिर्णय सांगतो -
अथसंक्षेपेणगोत्रप्रवरनिर्णयः तौचभिन्नौनिषेधेनिमित्तम् सगोत्रायदुहितरंनप्रयच्छेदित्यापस्तंबोक्तेः असमानप्रवरैर्विवाह इतिगौतमोक्तेश्च तत्रगोत्रलक्षणमाहप्रवरमंजर्यां बौधायनः विश्वामित्रोजमदग्निर्भरद्वाजोथगौतमः अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येतेसप्तऋषयः सप्तानामृषीणामगस्त्याष्टमानांयदपत्यंतद्गोत्रमिति यद्यपिकेवलभार्गवेष्वार्ष्टिषेणादिषुकेवलांगिरसेषुहारितादिषुचनैतत् भृग्वंगिरसोरुक्तेष्वनंतर्गतेः तथाप्यत्रेष्टापत्तिरेवेतिकेचित् अतएवस्मृत्यर्थसारे प्रवरैक्यादेवात्राविवाहउक्तः उद्यपिवसिष्ठादीनांनगोत्रत्वंयुक्तं तेषांसप्तर्षित्वेनतदपत्यत्वाभावात् तथापितत्पूर्वभाविवसिष्ठाद्यपत्यत्वेनगोत्रत्वंयुक्तम् अतएवपूर्वेषांपरेषांचैतद्गोत्रम् अत्रविशेषोऽस्मत्कृतप्रवरदर्पणेज्ञेयः ।
गोत्र आणि प्रवर हे विवाहाच्या निषेधाविषयीं वेगवेगळे कारण आहेत . म्हणजे वधूवरांचें गोत्र एक असलें तर विवाह होत नाहीं . आणि गोत्र भिन्न असून प्रवर एक असला तरी विवाह होत नाहीं . कारण , " सगोत्राला कन्या देऊं नये " असें आपस्तंबाचें वचन आहे . आणि " प्रवर समान नसेल त्यांच्याशीं विवाह होतो " असें गौतमाचें वचनही आहे . आतां गोत्र म्हणजे काय ? अशी आकांक्षा झाली असतां त्याचें लक्षण सांगतो प्रवरमंजरींत बौधायन - " विश्वामित्र , जमदग्नि , भरद्वाज , गौतम , अत्रि , वसिष्ठ , कश्यप , हे सात ऋषि आणि आठवा अगस्त्यऋषि यांचें जें अपत्य म्हणजे पुत्र , पौत्र वगैरे तें गोत्र होय . " येथेंच पुढें वत्स , बिद , आर्ष्टिषेण , यास्क , मित्रयु , वैन्य , आणि शुनक हे सात गण भृगुकुलांतील सांगितले आहेत त्यांत पहिले वत्स , बिद , हे दोन गण भृगुकुलांतील असून जमदग्नीच्या वंशांतील असल्यामुळें त्यांना गोत्रत्व आहे . आतां जरी आर्ष्टिपेन इत्यादिक जे पांच गण ते केवळ भृगुवंशांतील असल्यामुळें त्यांना हें वरील गोत्रलक्षण येत नाहीं . याचप्रमाणें आंगिरसाच्या वंशांतील गौतम , भरद्वाज आणि केवलांगिरस असे तीन मुख्य भेद पुढें सांगावयाचे आहेत , त्यांपैकीं केवल आंगिरस जे हारीतादिक त्यांना देखील हें वरील बौधायनोक्त गोत्रलक्षण येत नाहीं . कारण , भृगु आणि अंगिरा हे त्या बौधायनवचनांत नाहींत . तात्पर्य - आर्ष्टिपेण इत्यादिक आणि हारीतादिक यांना गोत्रत्व नाहीं , असें झालें . तथापि तें इष्ट आहे , असें कितीएक विद्वान् सांगतात . त्यांना गोत्रत्व नाहीं म्हणूनच स्मृत्यर्थसारांत त्यांचा एक प्रवर असल्यामुळेंच त्यांचा परस्पर विवाह होत नाहीं , असें सांगितलें आहे . ते सगोत्र आहेत म्हणून विवाह होत नाहीं , असें सांगितलें नाहीं . आतां जरी वसिष्ठ , कश्यप इत्यादिक हे वर सांगितलेल्या सात ऋषींमध्यें असल्यामुळें ते त्यांचे अपत्य नसल्याकारणानें त्यांना गोत्रत्व असणें युक्त होत नाहीं . म्हणजे गोत्रांमध्यें त्यांची गणना पुढें आहे ती अयुक्त होते , असें आलें , तरी ती अयुक्ते होत नाहीं . कारण , त्यांच्या पूर्वीं झालेल्या वसिष्ठादिकांचे हे वसिष्ठादिक अपत्य होत असल्यामुळें ह्या वसिष्ठादिकांना गोत्रत्व म्हटलें तें युक्तच आहे . म्हणूनच ह्या ऋषींच्या पूर्वीचे जे त्यांचें आणि पुढच्यांचेंही हें गोत्र आहे . या विषयाचा विशेष निर्णय आम्हीं ( कमलाकरभट्टानें ) केलेल्या प्रवरदर्पणांत पाहावा .
प्रवर म्हणजे काय तें सांगतो -
प्रवरास्तुप्रवरणानिप्रवराः कल्पकाराहिवासिष्ठेतिहोतावसिष्ठवदित्यध्वर्युरित्यादिनायेषांप्रवरणमामनंतितेप्रवराः तच्चवरणंयद्यपिगोत्रभूतस्यापिक्कचिद्दृश्यते तथापिपूर्ववदृषिभेदोद्रष्टव्यः अन्यथा तेषांत्र्यार्षेयेएकार्षेइत्यादिनिर्देशानुपपत्तेः अन्येतुतद्गोत्राणांत्र्यार्षेयइतिभेदमाहुरितिदिक् तत्त्वंतुगोत्रभूतस्यपितृपितामहप्रपितामहाएवप्रवराः पितैवाग्रेथपुत्रोथपौत्रइतिशतपथश्रुतेः परंपरंप्रथममित्याश्वलायनोक्तेश्च अत्रविशेषमाहबौधायनः एकएवऋषिर्यावत् प्रवरेष्वनुवर्तते तावत्समानगोत्रत्वमन्यत्रभृग्वंगिरसांगणादिति स्मृत्यर्थसारे व्रियमाणतयावापिसत्तयावानुवर्तनम् एकस्यदृश्यतेयत्रतद्गोत्रंतस्यकथ्यते भृग्वंगिरोगणेषुतुमाधवीयेस्मृत्यंतरे पंचार्षेत्रिषुसामान्यादविवाहस्त्रिषुद्वयोः भृग्वंगिरोगणेष्वेवशेषेष्वेकोपिवारयेत् शेषगोत्रेषुएकोपिसमानः प्रवरोविवाहंवारयेदित्यर्थः बौधायनोपि भृग्वंगिरसावधिकृत्यद्वयार्षेयसन्निपातेऽविवाहस्त्र्यार्षेयाणांत्र्यार्षेयसन्निपातेऽविवाहः पंचार्षेयाणामिति भृग्वंगिरोगणेष्वपिजमदग्निगौतमभरद्वाजेष्वेकप्रवरसाम्येसर्वेषामप्यसाम्येवासगोत्रत्वादेवाविवाहइतिदिक् ।
प्रवर म्हणजे वरण होय . कल्पसूत्रकारांनीं ‘ वासिष्ठेति होता वसिष्ठवदित्यध्वर्युः ’ इत्यादि वाक्यानें ज्यांचा उच्चार करुन यज्ञामध्यें ऋत्विजांचें वरण सांगितलें आहे ते प्रवर होत . आतां जरी तें वरण क्कचित् ठिकाणीं गोत्राचाही उच्चार करुन सांगितलेलें दृष्टीस पडतें तरी त्या ठिकाणीं तो गोत्रऋषि वेगळा आहे आणि प्रवरऋषि वेगळा आहे , असें समजावें . जसें - वर सांगितलें आहे कीं , पूर्वींच्या वसिष्ठादिकांचे हे वसिष्ठादिक अपत्य होत , त्याप्रमाणें इतर ऋषीचे हे प्रवर आहेत , असें समजावें . अन्यथा म्हणजे ऋषींचे प्रवर मानिले नाहींत तर " त्या ऋषींचे तीन प्रवर , एक प्रवर " इत्यादि जें सांगितलें त्याची संगति होणार नाहीं . इतर विद्वान् तर ‘ त्या गोत्रांचे त्रिप्रवर असतां ’ असा गोत्रऋषि व प्रवरऋषि यांचा भेद सांगतात . ही दिशा दाखविली आहे . याचा खरा प्रकार म्हटला तर असा आहे कीं , गोत्ररुप ऋषीचे पिता , पितामह , प्रपितामह हेच प्रवर होत . कारण , प्रवर वरण्याच्या वेळीं " प्रथम पिताच येतो , नंतर पुत्र , तदनंतर पौत्र येतो " अशी शतपथश्रुति आहे . आणि " पलीकडचा पलीकडचा तो प्रथम येतो " असें आश्वलायनाच्या सूत्रांतही सांगितलें आहे . गोत्रप्रवरांविषयीं विशेष सांगतो बौधायन - " प्रवर सांगत असतां त्या प्रवरांमध्यें जोंपर्यंत एकच ऋषि चाललेला आहे तोंपर्यंत त्या
सार्या प्रवरांचें एक गोत्र समजावें . हा प्रकार केवळ भृगुगण ( आर्ष्टिषेणादिक ) आणि केवलांगिरसगण ( हरितादिक ) हे वगळून समजावा . " स्मृत्यर्थसारांत - " ज्या गणामध्यें वरण होत असल्यामुळें अथवा आपल्या सत्तेच्या योगानें एकाची अनुवृत्ति ( संबंध , विद्यमानता ) दृष्टीस पडते त्या गणाचें तें गोत्र म्हटलें आहे . " भृगुगण आणि आंगिरसगण यांविषयीं तर सांगतो माधवीयांत स्मृत्यंतरांत - " भृगुगण आणि आंगिरसगण यांचे ठायीं पंचप्रवरी वधूवरांचे तीन प्रवर समान असतां विवाह होत नाहीं . आणि त्रिप्रवरी वधूवरांचे दोन प्रवर समान असतां विवाह होत नाहीं . भृगु व आंगिरस यांवांचून इतर गोत्रांचे ठायीं एकही समान प्रवर असतां विवाह होत नाहीं . " बौधायनही - भृगुगण व आंगिरसगण यांचा उद्देश करुन सांगतो - " त्रिप्रवर्यांचे दोन प्रवर समान असतां विवाह होत नाहीं . आणि पंचप्रवर्यांचे तीन प्रवर समान असतां विवाह होत नाहीं . " भृगुगणांतील जामदग्न्य ( वत्स , बिद ), आणि आंगिरस गणांतील गौतम आणि भरद्वाज यांचे ठायीं एक प्रवर समान असला तरी अथवा सारे प्रवर समान नसले तरी त्यांना सगोत्रत्व असल्यामुळेंच त्यांचा
विवाह होत नाहीं . ही दिशा दाखविली आहे .
आतां गोत्रें आणि प्रवर सांगतो -
अथगोत्राणिप्रवराश्चोच्यंते तत्रबौधायनः गोत्राणांतुसहस्राणिप्रयुतान्यर्बुदानिच ऊनपंचाशदेवैषांप्रवराऋषिदर्शनात् तत्रसप्तभृगवः वत्साबिदाआर्ष्टिषेणायस्कामित्रयुवोवैन्याः शुनकाइति वत्सानां भार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति भार्गवौर्वजामदग्न्येतिवा भार्गवच्यावनाप्नवानेतिवा बिदानांपंच भार्गवच्यावनाप्नवानौर्वबैदेति भार्गवौर्वजामदग्न्येतिवा एतौद्वौजामदग्न्यसंज्ञौ आर्ष्टिषेणानां भार्गवच्यावनाप्नवानार्ष्टिषेणानूपेति भार्गवार्ष्टिषेणानूपेतिवा एषांत्रयाणांपरस्परमविवाहः वात्स्यानाम् भार्गवच्यावनाप्नवानेति वत्सपुरोधसयोः पंच भार्गवच्यावनाप्नवानवात्स्यपौरोधसेति बैजमथितयोः पंच भार्गवच्यावनाप्नवानबैजमथितेति एतेत्रयः क्कचित् एषामपिपूर्वैरविवाहः अत्रतत्तद्गुणस्थाऋषयोऽन्यश्चविशेषोमत्कृते प्रवरदर्पणेज्ञेयः यस्कानां भार्गववैतहव्यसावेतसेति मित्रयुवां भार्गववाध्र्यश्वदैवोदासेति भार्गवच्यावनदैवोदासेतिवा वाध्र्यश्वेत्येकोवा वैन्यानांभार्गववैन्यपार्थेति एतएवश्येताः शुनकानांशुनकेतिवा गार्त्समदेतिवा भार्गवगार्त्समदेतिद्वौवा भार्गवशौनहोत्रगार्त्समदेतित्रयोवा वेदविश्वज्योतिषांभार्गववेदवैश्वज्योतिषेति शाठरमाठराणांभार्गवशाठरमाठरेति एतौद्वौ क्कचित् यस्कादीनांस्वगणंत्यक्त्वासर्वैर्विवाहः तदुक्तंस्मृत्यर्थसारे यस्कामित्रयवोवैन्याः शुनकाः प्रवरैक्यतः स्वंस्वंहित्वागणंसर्वेविवहेयुः परावरैरिति ।
याविषयीं बौधायन - " गौत्रें किती आहेत असें म्हटलें तर तीं सहस्त्रावधि , लक्षावधि , कोठ्यवधि आहेत त्यांची संख्या करावयास येणार नाहीं . त्यांच्या प्रवरांचे ऋषि पाहिले असतां त्या सहस्त्रावधि गोत्रांचे प्रवरभेद एकूणपन्नासच होतात . " गोत्रें अनंत असलीं तरी त्यांचे प्रवरभेद ४९ आहेत ; ते येणेंप्रमाणें - भृगुगण ७ , अंगिरसगण १७ , अत्रिगण ४ , विश्वामित्रगण १० , कश्यपगण ३ , वसिष्ठगण ४ , अगस्तिगण ४ , हे सारे मिळून ४९ गण होतात . त्या एकेका गोत्रगणामधील अंतर्गत गोत्रें बहुत आहेत , परंतु त्यांचे प्रवर एक असल्यामुळें तो एक गोत्रगण समजावा . याप्रमाणें बौधायनांनीं ४९ गोत्रगण सांगितले आहेत ; तरी इतर ग्रंथांतून सांगितलेले अधिकही गोत्रगण आहेत ते त्या त्या प्रसंगीं सांगूं . कोणकोणाचा विवाह होतो आणि कोणकोणाचा विवाह होत नाहीं हें स्पष्ट समजावयासाठीं प्रवरांचीं कोष्टकें देतों . एका कोष्टकांत असलेल्यांचीं भिन्न गोत्रें व भिन्न प्रवर असले तरी विवाह होत नाहीं . ज्या ठिकाणीं भिन्न कोष्टकांत असलेल्या गोत्रांचाही विवाह होत नाहीं , असें असेल त्या ठिकाणीं टीप दिलेली आहे .
भृगुगण ७ ते असे -
वत्स - मार्कंडेय इत्यादिक दोनशेंहूनअधिक गोत्रें आहेत ते सारे वत्स त्यांचे ‘ भार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति ’ हे पांच प्रवर आहेत . अथवा ‘ भार्गवौर्वजामदग्न्येति ’ हे तीन प्रवर किंवा ‘ भार्गवच्यावनाप्नवानेति ’ हे तीन आहेत .
बिद - शैल , अवट इत्यादिक विसांहून अधिक गोत्रें आहेत ते सारे बिद होत . त्यांचे - ‘ भार्गवच्यावनाप्नवानौर्वबैदेति ’ पांच प्रवर . अथवा ‘ भार्गवौर्वजामदग्न्येति ’ तीन प्रवर .
आर्ष्टिषेण - नैऋति , याम्यायण इत्यादिक विसांहून अधिक आर्ष्टिषेण होत . त्यांचे - ‘ भार्गवच्यावनाप्नवानार्ष्टिषेणानूपेति ’ पांच प्रवर . अथवा ‘ भार्गवार्ष्टिषेणानूपेति ’ तीन प्रवर . वत्स , बिद , आर्ष्टिषेण या तिघांचा परस्पर विवाह होत नाहीं . कारण , दोन किंवा तीन प्रवर समान आहेत .
वात्स्यांचे - ‘ भार्गवच्यावनाप्नवानेति ’ तीन प्रवर .
वत्सपुरोधसांचे - ‘ भार्गवच्यावनाप्नवानवत्सपौरोधसेति ’ पांच .
बैजमथितांचे - ‘ भार्गवच्यावनाप्नवानबैजिमथितेति ’ पांच . वात्स्य , वत्सपुरोधस आणि बैजमथित हे तीन गण अधिक क्कचित् आहेत . या तिघांचा परस्पर आणि वर सांगितलेल्या तीन गणांशीं विवाह होत नाहीं .
यस्क - मौन , मूक इत्यादि त्रेपन्नांहून अधिक यस्क आहेत . त्यांचे - ‘ भार्गव वैतहव्य सावेतसेति ’ तीन प्रवर .
मित्रयु - रौष्ठ्यायन सापिंडिन इत्यादि तिसांहून अधिक मित्रयु आहेत . त्यांचे - ‘ भार्गववाध्रयश्वदैवोदासेति ’ तीन अथवा ‘ भार्गवच्यावनदैवोदासेति ’ तीन . किंवा ‘ वाध्र्यश्वेति ’ एक प्रवर .
वैन्य - पार्थ , बाष्कल , श्येत , हे वैन्य होत . यांचे - ‘ भार्गव वैन्य पार्थेति ’ तीन प्रवर .
शुनक - गार्त्समद , यज्ञपति इत्यादिक सत्तरांहून अधिक शुनक होत . त्यांचे - ‘ शौनकेति ’ एक अथवा ‘ गार्त्समदेति ’ एक किंवा ‘ भार्गव गार्त्समदेति ’ दोन . अथवा ‘ भार्गवशौनहोत्रगार्त्समदेति ’ तीन आहेत .
क्कचित् ठिकाणीं दोन गण अधिक आहेत ते असे -
वेदविश्वज्योतिष - यांचे ‘ भार्गववेदवैश्वज्योतिषेति ’ तीन .
शाठरमाठर - यांचे - ‘ भार्गव शाठर माठरेति ’ तीन .
वर सांगितलेले यस्क , मित्रयु , वैन्य , शुनक , यांचे आप आपले गण सोडून बाकीच्या सर्वांशीं विवाह होतो . तें सांगतो स्मृत्यर्थसारांत - " यस्क , मित्रयु , वैन्य , आणि शुनक यांचा आप आपल्या गणाचा प्रवर एक असल्यामुळें आप आपला गण सोडून पुढच्या व मागच्या सर्वांशीं विवाह होतो " याचप्रमाणें वेदविश्वज्योतिष आणि शाठरमाठर यांचाही परस्पर व पूर्वांशीं विवाह होतो .
इति भृगुगण .