मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
गिरिशिखरें, वनमालाही दरीद...

निर्झरास - गिरिशिखरें, वनमालाही दरीद...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


गिरिशिखरें, वनमालाही दरीदरी घुमवित येई !
कडयावरुनि घेऊन उडया  खेळ लतावलयीं फुगडया.
घे लोळण खडकावरती,  फिर गरगर अंगाभंवतीं;
जा हळुहळु वळसे घेत  लपत - छपत हिरवाळींत;
पाचूंचीं हिरवीं रानें  झुलव गडे, झुळझुळ गानें !
वसंतमंडप - वनराई  आंब्याची पुढतीं येई.
श्रमलासी खेळुनि खेळ  नीज सुखें क्षणभर बाळ !
हीं पुढचीं पिंवळीं शेतें  सळसळती - गाती गीतें;
झोंप कोठुनी तुला तरी,  हांस लाडक्या ! नाच करीं,
बालझरा तूं वालगुणी,  बाल्यचि रे ! भरिसी भुवनीं !

बालतरू हे चोंहिकडे  ताल तुला देतात गडे !
प्रेमभरें त्यांवर तूंहि  मुक्त - मणि उधळुनि देई !
बुदबुद - लहरी फुलवेली  फुलव सारख्या भंवतालीं,
सौंदर्ये हृदयांमधली  दे विश्वीं उधळून खुलीं !
गर्द सावल्या सुखदायी  वेलींची फुगडी होई !
इवलालीं गवतावरतीं  रानफुलें फुलती हंसती,
झुलवित अपुले तुरे - तुरे  निळी लव्हाळी दाट भरे.
जादूनेंच तुझ्या बा रे ?  वन नंदन बनलें सारें !
सौंदर्याचा दिव्य झरा  बालवसंतचि तूं चतुरा;
या लहरीलहरीमधुनी  स्फूर्ति दिव्य भरिसी बिपिनीं

आकाशामधुनी जाती  मेघांच्या सुंदर पंक्ति;
इंद्रधनूची कमान ती  ती संध्या खुलते वरतीं;
रम्य तारका लुकलुकती  नीलारुण फलकावरतीं;
शुभ्र चंद्रिका नाच करी  स्वर्गधरेवर एकपरी;
हीं दिव्यें येती तुजला  रात्रंदिन भेटायाला !
वेधुनि त्यांच्या तेजानें  विसरुनियां अवधीं भानें
धुंद हृदय तव परोपरी  मग उसळी लहरीलहरी
त्या लहरीमधुनी झरती  दिव्य तुझ्या संगौततति !
नवल न, त्या प्राशायाला  स्वर्गहि जर भूवर आला !
गंधर्वा ! तव गायन रे  वेड लाविना कुणा बरें !

पर्वत हा, ही दरीदरीं  तव गीतें भरलीं सारीं,
गाण्यानें भरलीं रानें, वर - खालीं गाणें गाणें !
गीतमय स्थिरचर झालें !  गीतमय ब्रम्हांड डुले !
व्यक्त तसें अव्यक्तहि तें  तव गीतें डुलतें डुले !
मुरलीच्या काढित ताना  वृंदावनिं खेळे कान्हा;
धुंद करुनि तो नादगुणें  जडताही हंसवी गानें;
दिव्य तयाच्या वेणुपरी  तूंहि निर्झरा ! नवलपरी
गाऊनि हें झुळझुल गान  विश्वाचें हरिसी भान !
गोपि तुझ्या हिरव्या वेली  रास खेळती भंवतालीं !
तुझ्या वेणुचा सूर तरी  चराचरावर राज्य करी !

काव्यदेविचा प्राण खरा  तूंच निर्झरा ! कवीश्वरा !
या दिव्याच्या धुंदिगुणें  दिव्याला गासी गार्णे,
मी कवितेचा दास, मला  कवी  बोलती जगांतला,
परि न झरे माझ्या गानीं  दिव्यांची असली श्रेणी !
जडतेला खिळुनी राही  हृदयबंध उकलत नाहीं !
दिव्यरसीं विरणें जीव  जीवित हें याचें नांव;
तें जीवित न मिले मातें  मग कुठुनी असलीं गीतें ?
दिव्यांची सुंदर माला  ओंवाळी अक्षय तुजला !
तूंच खरा कविराज गुणी  सरस्वतीचा कंठमणि
अक्षय तव गायन वाहे  अक्षयांत नांदत राहे !

शिकवी रे, शिकवी मातें  दिव्य तुझीं असलीं गीतें !
फुलवेली - लहरी असल्या  मम हृदयीं उसळोत खुल्या !
वृत्तिलता ठायीं ठायीं ठायीं  विकसूं दे सौंदर्यांहीं !
प्रेमझरी - काव्यस्फूर्ति  ती आत्मज्योती चित्तीं
प्रगटवुनी चौदा भुवनीं दिव्य तिचे पसरी पाणी !  
अद्वैताचें राज्य गडे !  अविच्छिन्न मग चोहिंकडे !
प्रेमशांतिसौंदर्यांहिं  वेडावुनी वसुधामाई
मम हृदयीं गाइल गाणीं  रम्य तुझ्या झुळझुळ वाणी !
आणि जसें सगळें रान  गातें तव मंजुळ गान,
तेंवि सृष्टिची सतार ही गाइलं मम गाणीं कांहीं !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP