ज्योत - व्योमीं पाहुनि अरुणातें ।...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
व्योमीं पाहुनि अरुणातें । दीप विझविला पटवातें
मावळली ती वायूंत । तेजोमय दीपज्योत १
देहाला टाकुनि जातीं । प्राण्यांचे आत्मे वरतीं
त्यापरि टाकुनि धूमाला । दीपाचा आत्मा गेला २
अद्दश्य जें जग त्याच्यांत । जाउनि ती विरली ज्योत
गेली ! नाशाला गेली । नाहीं हो ! अक्षय झाली ३
वाय़ूच्या उदरीं गेल्या । असंख्यात ज्योती असल्या
स्वर्ग तोच, त्या बसतात । जेथें या अवकाशांत ४
देवाच्या छत्राखालें । संमेलन त्यांचें झालें
पावित्र्याच्या त्या मूर्ती । दिसतिल का फिरूनी जगतीं ५
मूर्तच त्या होतील जरी । चकाकेल सृष्टी सगळी
खरी दिवाळी येईल । तेजोमय जग होईल ६
हाय ! परी होइल का तें । येतिल का ज्योती येथें
रमल्या त्या स्वानंदांत । मर्त्य जगीं का येतात ? ७
निदान दर्शन बा बायो । आम्हांला त्यांचें होवो
पाहूं दे तीं भांडारें । नेत्र भुकेले झाले रे ८
दिसतिल ते सारे तेथें । देशाचे अमुच्या नेते
या विश्वाचे दीपक रे । असतिल तेथें बघूं बरें ९
दाविसी न मज कां वाता । जा नच तव पर्वा आतां
देहदीप विझणारच हा । जाइन मीं मग तिथें अहा १०
दिव्यपणा येईल मला । बघण्याला ज्योती विमला
त्यांसह त्यांत राहीन । स्वानंदीं होऊनि लीन ११
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP