सुकलेलीं फुलें
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
अंजनीगीत
आयुष्याच्या प्रभातकालीं
चित्ताच्या क्षितिजावर आलीं,
सुस्वप्नें तीं क्षण लकलकलीं -
विलयाला. गेलीं. १
कालतरूचीं गलित फुलें तीं
पुनरपि फुलतिल का मजभोंतीं ?
स्मरतां त्यांना अहा उसळती -
हृदयाच्या वृत्ती. २
स्मरणाच्या थडग्यांतुनि या रे !
सुमनांनो भूवरती सारे !
खेळ करूं ते पुन्हां एकदां
पूर्वीं जे केले. ३
दिव्य माझिया नक्षत्रांनो !
बाल्यवनींच्या वनविहगांनो !
या चिमण्यांनो ! या छकुल्यांनो !
या, या, या आतां, ४
प्रेमपूर्ण मधु बाल्य अहा तें
तुम्हांसंगतीं येइल येथें;
मींही सोडुनि तारुण्यातें
होइन बाल पुन्हां. ५
प्रेमावांचुनि अन्य न कांहीं,
दुष्टपणाचाअ स्पर्शहि नाहीं,
अंधाराचा मागमूसही
न दिसे ज्या ठायीं, ६
त्या वाल्याच्या सीमेवरते
दुष्ट मत्सरी जगतापरते
प्रेमाचें साम्राज्य सभोंतें
बनवोनी राहूं. ७
स्वानंदाच्या त्या रानांत
मृदु हास्याचें पेरुनि शेत,
परस्परांचे धरुनी हात
नाचूं स्वछंदें, ८
सत्त्वविशिष्ट प्रेमावरतीं
स्वर्गाची जर आहे वसती
नयनरज्जुंनीं बांधुनि आणूं
तर तो भूवरतीं, ९
ज्या प्रीतीच्या मंजुळ नादें
बाल्याच्या मोहोनी छंदें
वाजविली मुरली गोविंदें -
सर्वांनी ठावें १०
ती मुरली घेवोनी हातीं
दिव्य नाद तो भरित दिगन्तीं
या बाल्याच्या सीमेवरतीं
आपणही राहूं. ११
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP