थडग्यांतील रमणी - होतें एक असें जुनाट थडगें...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
होतें एक असें जुनाट थडगें, झाडें तयाभोंवतीं
काटयांचीं किति वाढुनी विषम तो भूभाग आच्छादिती;
सर्वांच्याहि वरी उठे वट परी तो, तो करी त्यावरी
काळी गर्द भयाण, भीषणपणा स्थानावरी त्या वरी.
वाहे एक झरा असा जवळुनी, ती पैल झाडी असे;
सौंदर्यैकनिधान निश्चलपणा तीमाजिं सौंख्यें वसे,
प्रेमें पाहत त्याकडे बसुनि मी निश्चिंत त्या आसनीं,
या ऐशा थडग्यावरी बसुनि त्या ओढयाकडे पाहुनी
मी एथें किति काळही दवडिला नाना विचारांतरीं;
होती निर्भर पौर्णिमा, विमल तो शीतांशु विश्वावरी;
प्रेमाची अपुल्या अनंत विमलच्छाया सुखाची करी.
ग्रीष्माच्या दिवसांत ती कितितरी मातें सुखाची गमे,
मी ऐसा बसलों पहात, मनही माझेम तयानें रमे;
गेला काळ असा किती मज नसे त्याची मुळीं कल्पना,
एकाकी परि वाटलें हदरली ही भूमि ऐसें मना.
मी पाहें वळुनी, अहो नवल कीं, हो भूमिचें कंपन.
तेणें तें थडगें दुभंगुनि पहा कोणीतरी त्यांतुन -
होती ती रमणी विशुद्ध तरुणी सौंदर्यरंगांगिणी
ती राणी गुणशालिनी विजयिनी हो भूतकालीं कुणी;
होतें शुभ्र जरी मुखावर तिच्या आपाद आच्छादन,
चंद्राच्या स्फटिकप्रभेंत दिसलें तदरूपही त्यांतुन.
ती देवी यवनी असूनिहि पहा माझ्या मनाला किती
तदगांभीर्य बघूनि जी उमटली श्रद्धा, न तीची मिती;
प्रेमें जोडुनि अंजली चकित मी पाहोनि तीचेकडे
हे अर्धस्फुट बोल कंपित रवें मी बोललों विस्मित -
‘भूमीच्या उदरीं अहा कितितरी रत्नें निमालीं, परी
त्यांतोनी न पुन्हां कुणीहि उठुनी आलें असे भूवरी.
या ऐशा थडग्यामधूनि अपुली दिव्यप्रभा घेऊनी
हे देवी विजयस्विनी, फिरुनिया आलीस तूं कां जनीं ?
नाना कीट वनस्पतींतही तुझें हें रूप ऐशापरी
राहे केविं विशुद्ध हें नवल कीं वाटे मदीयांतरीं;
हा द्दष्टिभ्रम काय ? रूप अपुलें जें हें तुवां दाविलें
तें नाहीं हविलें विशुद्ध उरलें कालप्रवाहानलें ? -
अपूर्ण
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP