गाणार्या पक्ष्यास - समय रात्रीचा कोण हा भयाण ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
समय रात्रीचा कोण हा भयाण !
बळें गर्जे हें त्यांत घोर रान,
अशा समयीं छबुकडया पांखरा तूं.
गात अससी; बा काय तुझा हेतू ?
गिरी वरतीं हा उंच उंच गेला,
तमें केलें विक्राळ किती याला.
दरी गर्जे, फूत्कार पहा येती,
किती झंझानिक घोर वाहताती.
दीर्घ करिती हे घूक शब्द कांहीं;
क्रूर नादें त्या रान भरुनि जाई.
अशा समयीं हें गोड तुझें गाणें
रम्य पक्ष्या, होईल दीनवाणें.
तुझ्या गानाचें मोल नसे येथें,
कुणी नाहीं संतुष्ट ऐकण्यातें;
जगें अपुल्या कानास दिलीं टाळीं.
वृथा मानाची हाव अशा वेळीं.
तुझें गाणें हें शांत करी आतां,
पहा, गर्जे वन घोर हं सभोता.
किर्र करिती हे तीक्षण शब्द कीट,
असे त्यां (चा) या समयिं थाटमाट,
पुढें येइल उदयास अंशुमाली,
दिशा हंसतिल वन धरिल रम्य लाली.
हरिणबाळें फिरतील सभोंवार.
तदा येवो गाण्यास तुझ्या पूर.
तुझे भ्राते दिसतील एक ठायीं,
हरित कुंजीं ज्या हास्य पूर्ण कांहीं.
वदुनि त्यांच्या सह रम्य गीत बा रे,
मधुर नादें वन भरुनि टाक सारें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP