जीर्ण दुर्ग - दुर्ग भयंकर जीर्ण पसरला प...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
दुर्ग भयंकर जीर्ण पसरला पुढतीं, जो गतकालीं
शूर साहसी नरसिंहांनीं अपुली वसती केली.
कडयाकडयांमधिं घुमुनि नर्मदा गात यशोमय गीतें;
सांगत होती सर्व देशभर सद्य:कर्तव्यातें.
रंगमहालीं शेज फुलांची याच गडावर झाली,
स्वातंत्र्यास्तव अग्नि भडकला - राख तयाची केली.
तरवारीची धार देवता हीच जयांची एक,
ब्रीद जयाचें सदा तियेला रुधिराचा अभिषेक.
जीव नव्हे संसार ओपिला स्वातंत्र्यास्तव ज्यांनीं,
त्या वीरांचा वास जाहला गतकालीं या स्थानीं,
आतां कोणी क्षुद्र पुजारी देविस पूजायातें
घालित बसतो कुंकुमपूरित चंदन अपुल्या हस्तें
आणि पिवोनि भांग दुखारी झिंगत वदतो कांहीं
पूर्वकथा निर्विकार चित्तें. हर्षित दोन पयांहीं
हे काळाचे खेळ, कुठेंही असेच चालायाचे,
त्यास कशाला परि आम्हांला कांहिं न वाटे त्याचें
एक खुराडें - भाडयाचें तें - राहूं त्यांत खुशाल
क्षुद्रा जिवांना अम्हां कशाला असले रंगमहाल !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP