हृदयाची गुंतागुंत कशी उकलावी ?
ही तीव्र वेदना मनामनाची ठावी.
अंधार दाटला अपार भरला पूर.
परि पार तयाच्या कोण मला नेणार ?
हें ज्ञान मला तर अज्ञानापरि भासे,
मी सोडवितां तें उलटें बांधी फासे,
मन विटलें, विटली शब्दचिकित्सा सारी;
मी फिरतां गरगर बुद्धि तयामाझारीं,
सौंदर्य फुलांचें, गाणीं वनविहगांचीं,
ती गोड शांतता हिरव्या वृक्षलतांची,
शीतलता सुंदर चंचल निर्झरिणींची,
गंभीरपणाची मूर्ती गिरिरायाची,
मज रुचे न किमपी व्यापकता गगनाची;
तीं अनंततेचीं किरणें ग्रहगोलांचीं
ती अमर्यादता अचिंत्य गूढ दिशांची,
ही अगाधता कीं सर्वंकष कालाची !
हें दिसून सर्वहि मज न दिसेसें होई.
अमजून मनाला कांहीं उमगत नाहीं.
हे धर्म सांगती भिन्न भिन्न पथ काहीं,
मम वृत्ति सांगती भिन्न तुजा पथ पाहीं,
ही बुद्धि सांगतां मन ऐके ना तीतें.
हें चित्त वदे तें पटेच ना बुद्धीतें.
द्वैताची असली अक्षय झोंवी चालें.
सुंखदु:खीं खातें चंचल चित्तहि झोले.
दुर्भाग्य दुर्बळा मनास दिसतें सारें,
परि चंचल चळतें चपळहि चित्त कसें रे !
मानवतो कवणां स्वार्थ, कुणां परमार्थ,
परि अर्थ दिसेना हाय मला उभयांत,
वैराग्य बरें कीं सुखद बरा अनुराग,
परि हाय प्रीतिचें उगाच माझें सोंग.
तें कर्म बरें कीं बरवा कर्मत्याग ?
दुर्दैव तसें, मज नव्हे त्याग ना भोग.
ती श्रद्धा बरवी अश्रद्धाहि बरी ती;
परि मानवते मज मधेंच भलती रीति.
ब्यामोह भयंकर दुस्तर भरला भारीं.
कीं जीव दडपतो मम निद्रेमाझारीं !
मज व्यर्थ नको तीं अमरपणाचीं गाणीं;
कुणि उठवा असल्या गहनांतुनि हलवोनी.
तूं तुझाच कर उद्धार बोल हे कळती,
परि सहायार्थ या वृत्ति मनीं तळमळती,
हा हाक मारतो उठवा मजला कोणी,
या भर निद्रेच्या दुस्तर गहनांतूनी.
दिन पक्ष मास ऋतु वर्ष भराभर गेले
हें रक्त जसेंच्या तसेंच सांकळलेलें -