काय असे संसारांत ? - आशा सरली, प्रीति निमाली, ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
आशा सरली, प्रीति निमाली,
नैराश्याची भयाण काळी
रजनी ही चहुंकडे पसरली,
मार्ग सांपडेना त्यांत.
माळ म्हणोनी धरीं जिला तीं,
व्याळ होऊनी डंखे चित्तीं.
सत्य म्हणा कीं कुलटा प्रीती
मज लोटी पाताळांत
स्वार्थसुखाची झाली होळी.
रपमार्थाची राखरांगुळी,
दुर्दैवाची पिकली पोळी,
काय राहिलें जगतांत.
हें चिंतेचें वादळ सुटलें.
सुखसरितेचें पाणि आटलें.
दु:ख दवाग्नी क्रूर भडकलें.
देह पोळला हा त्यांत,
भारभूत मज नको जिणें हें.
उदास विश्वच मजला आहे.
सोड दयाळा प्रभो ! प्रार्थना
हीच तुला आहे.
हें जग अवघें अवघें खोटें.
नित्य चाललें हें उफराटें,
पुरे बोचले याचे कांटे,
धांव दयासिंधो !
हा काळाचा उदार सागर
रमे तुझ्यासह प्रशांत निर्भर,
त्यांतुनि लहरी एक उंच कर
मज उदरी घ्याया.
क्रूर जगीं या कसलें गाणें ?
कसलें हसणें कुठें खेळणें ?
तुझ्या पदीं घे मग प्रेमानें
गाइन मी तेथें
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP