जग - तूं तर मित्र जगाचा - कां ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
तूं तर मित्र जगाचा - कां मग चिंता खेद कशाचा ?
कल्पद्रुम हें जग होईल.
इच्छित सारें हें जग देइल.
मोक्षपथाला हें जग नेइल,
तूंधर कास तयाची - घे करुनी चिर संगत त्याची
स्वर्ग कुठें तो जगतीं आहे,
प्रणयझरी बघ येथुनि वाहे,
चिच्छांतीचे पाट पहा हे !
निर्झरिणी बघ येथें - साची सौख्य समाधानाची
अक्षय हें जग, अक्षय तूंही,
नित्य तयांतच मिसळुनि राही,
आनंदा मग वाणच नाहीं,
‘मिथ्या भूल जगाची’ हीं सगळी वचनें स्वार्थांचीं
‘घे जगताची समजुनि गोडी,’
यास्तव तुजला ईश्वर धाडी,
चल ये सोडय याचीं कोडीं,
हीं परमानंदाचीं - हींच कपाटें प्रेमरसाचीं.
तुजसाठीं हें सगळें काहीं,
वाइट येथें अल्पहि नाहीं.
ज्ञानद्दष्टी उघडुनि पाहीं,
यांतच जीवित वेंची, घे निवडुनि हीं रत्नें याचीं.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP