पक्ष्यांचें गाणें - प्रणयमंजुषा उषा उदेली. दि...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
प्रणयमंजुषा उषा उदेली.
दिव्यत्वानें वसुधा नटली,
कीं स्वर्गाची प्रभा फाकली ही वरतीं खालीं.
निर्विकार विश्वाचें अंतर
प्रशांत पसरे नभ:पटावर
शांतिदायिनी भूमि मनोहर ही हंसते खालीं.
पटल धुक्याचें हळूंच सारुनि,
चंडोलाच्या चाटु वचांनीं.
स्पष्ट भूमिला समजावोनी हा चुंबी तरणी.
उष:कालचीं मंगलगीतें
ही सरिता, हें कानन गातें.
हा विहगांचा ध्वनी मजेचा साथचि हो त्यातें.
प्रभातवायू मंद वाहती,
वनराजी आंदोलन घेती,
हळूंच लतिका फुलें आपुली - उधळुनिया देती.
माझ्या प्रिय विहगांनो, आतां
प्रसंग सुंदर असा कोणता ?
यापुढतीं हो उघडा अपुली - प्रेमाची गाथा.
पुरे कोटरीं आतां वसती,
रान मोकळे, पुष्पें हंसती:
उडा बागडा प्रशांत गगनीं जा, जा वरतीं.
नभांत मारा उंच भरारी,
प्रेमपूर्ण कीं रमा भूवरी,
विविधा सृष्टी ही देवाची तुमची ही सारी.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP