मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
कुरण वायुशीं मंद डोलतें ह...

हरिण आणि गायन - कुरण वायुशीं मंद डोलतें ह...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


कुरण वायुशीं मंद डोलतें हें,
मधुनि ओढा हा हळूंहळूं वाहे
वृक्षलतिकांची चोंहिकडे दाटी,
दिसत तेणें रमणीय भूमि मोठीं. १

एक हरिणाचें बाल फिरे त्यांत,
वनश्रीचें उत्तान जणूं चित्त;
उडया मारी क्षण चोंहिकडे पाहे,
मोद कीं हा भूवरी दुजा आहे. २

कुठुनि आली तों उंचशी लकेर
अहा गानाची संथ संथ फार ?
जणूं वायूवर ऊर्मि कोरितें तें;
हरिणबाळा त्या स्वैर मोहवीतें. ३

सर्व गेलीं हरपोनि देहभानें,
बाळ रमलें त्या मधुर गायनानें,
चित्त सगळें कर्णांत सांठवोनी
गुंग झालें त्या पूर्णपणें गानीं, ४

जवळ आलें तें गान, त्या लकेरी
रम्य नांदे भारील दिशा चारी.
चढे धुंदी त्याचीच हरिणाबाला;
हाय ! दुर्दैवी ! तेंचि, घात केला ५

बाण आला तो हाय रे कुठोनी
बसे मर्मीं बाळास त्या रुपोनी,
क्षणीं आलें तें हरिण (बाळ) खालीं;
भिजुनि रक्तानें चिंब तनू झाली ६

मृत्यु नेत्रीं येवोनि उभा ठेला
शब्द उमटेना, कंठ शुष्क झाला
हाय ! काळानें ओढुनिया नेलें.
हरिणबालक तें भाबडें विचारें ! ७

फसो, फसलें चिमुकलें हरिणबाळ
सदा वनवासी अप्रबुद्ध लोल,
परी फसतों सज्ञान असे आम्ही
मोहजाळीं गुंतूनी क्रोधकामीं. ८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP