अस्तगिरीच्या अभिनव कुंजीं निजला निजनाथ,
बघतां बघतां त्यास रंगलें वारुणिचें चित्त,
हळुंच पाहते, मधुर हांसते, जाते लाजून,
म्हणे मनाशीं, ‘जीव टाकुं का हा ओवाळून !’
प्रेमनिर्भरा बघुन सखीला भास्कर मायावी
जातां जातां साखरचुंबा एक तिचा घेई !
लाजलाजुनी जीव सतीचा मग अर्धा झाला,
त्यांतच आल्या रोषाच्याही लहरी गालाला !
गेला, झाला द्दष्टिआडही सूर्य, तरी अजुनी
पहा चकते प्रेमपताका पश्चिमदिग्वदनीं,
थक्क होऊनी दिशा म्हणाल्या ‘काय मोहिनी ही !
प्रेमसमाधी अजुनि खुळीची या उतरत नाहीं !’
‘किती पश्चिमे ! आतां त्याचें चिंतन करशील ?
द्दष्टि लावुनी अशीच बसशिल सांग किती वेळ ?
खिन्नपणा हा पुरे, पुरे अश्रुंची माळ !
उद्यां बरं का तो राणीला अपुल्या भेटेल.
संध्येच्या खिडकींत येऊनी ही हंसरी तारा,
हळुंच पाहते. सुणावितेही ‘या - या’ कोणाला ?
पलिकडचा तो तेजोमन नव पडदा सारून
बघते, हंसते, क्षणांत लपते, ही दूसरी कोण ?
लाजत लाजत असाच येइल सारा स्वलोंक,
मुग्ध बालिका जमतिल गगनीं आतां नवलाख.
प्रथम तारके ! पहा सखी तब एक पुढें आली
ही दुसरी, ही तिसरी - आतां कितितरी भंवतालीं !
आली होती भरती आतां अस्तसमुद्राला,
त्या लाटांतुन काय सांडल्या या मौक्तिक्रमाला !
कल्पतरूचीं फुलें उडालीं कीं वार्यावरती ?
आकाशींच्या गंगेला कीं बुदबुद हे येती ?
नवटिकल्यांची चंद्रकळा कीं गगनश्री नेसे ?
स्वर्गींचें भांडार उघडलें कीं रात्रीसरसें ?
विश्वशिरावर ठोप चढविला हिर्यामाणकांचा !
मंगल, मंगल, जिकडे तिकडे जय मांगल्याचा !
रजनीदेवी ! वैभवशाली तूं अमुची राणी,
हीं नक्षत्रें, तारा सार्या, लीन तुझ्या चरणीं.
ज्याच्या त्याच्या तारा वांटुन दे ग्रहगोलांना,
गगनमंडलीं फेर धरुं दे प्रेमाचा त्यांना
दिशादिशांला तुझीं गाउनी प्रेमाचीं गाणीं
रजनीदेवी ! विश्व टाक हें प्रेमें भारोनी !
काळ्या काळ्या या पडणार्या अंधारासंगें
ब्रम्हांडाचें हृदय नाचवी प्रेमाच्या रंगें !
काळ्या अंधारांत खेळतें विश्व लपंडाव,
तार्यांवरती बसून बघती तें कौतुक देव.
दहा दिशांनीं पांघरूनि या काळ्या बुरख्याला
काळा बागुल काळोखाचा एक उभा केला.
मंद मंद तेजांत शोधिते गगनश्री त्यांना,
पाजळूनि हे नक्षत्रांचे रत्नमणी नाना.
खेळ चालला एकसारखा हा खालींवरतीं,
पूर्व दिशाहि तोंच हांसली, सांपडली हातीं
उदयगिरीवर नवतेजाची शांत पताका ही !
कीं गंगेच्या शुभ्र जलाचा झोत वरी येई.
हे मेघांचे धुऊन पडदे स्वच्छ कुणीं केले ?
मंगल मंगल तेज चहुंकडे कुठुनि बरें आलें ?
अर्ध्या मिटल्या अर्ध्या उघडया असल्या नयनांनीं
कुणास बघती दिशा कळेना मंदस्मित करुनी ?
पहा उदेला दिव्य गोल हा - छे ! भलतं कांहीं !
हा तारांचा सखा तयांना भेटाया येई.
तुमची राणी बसे सारखी तुम्हां न्याहाळीत,
गगनाच्या चौकांत चला हो, या रजनीनाथ !
धवल चंद्रिके ! दे आलिंगन दिव्य यामिनीला,
बहिणी - बहिणी तुम्ही सुखानें चंद्राशीं खेळा !
कां तारांनो ! तुम्ही लाजतां ? हा मंगला काल !
निर्मत्सर व्हा, प्रेमसंगमीं पोहा चिरकाल.
ब्रम्हांडाचा गोल धरी या प्रेमाचा फेर
फुलें शांतिचीं पहा उधळलीं जगतीं चौफेर !
निज निज आतां म्हणे जगाला वत्सलता माता,
रजनीदेवी गात बैसली अंगाईगीतां,
गगनाच्या या शेजेवरतीं निजवा तारांना,
चंद्रा ! दे ओढणी तुझ्या नव तेजाची त्यांना
हंसतां हंसतां झोंप लागली दहा दिशांनाहि,
ब्रम्हांडाचा गोल डोलतो, पण जागा नाहीं !
या प्रेमाला गातां कविचेंही चित्त
प्रेमाच्या निद्रेंत रंगलें पाठ गात गात.