ये, ये, ये आई, ये बाई, रजनिमुखी लवलाही;
मजला पाहूं दे, स्वानंदें, कृष्ण तमीं नभ कोंदे.
वाहूं दे वारे, त्यांतून, दिव्य शांति घेऊन;
दुर्धर कर्कश गे, या बसली, कर्णसंपुटीं टाळी;
एकहि धड नाद, येईना, ऐकाया श्रवणांना.
नसता कल्लोल, दिवसाचा अवघा स्वार्थ चराचा,
घालवुनी आतां, ये येथें शांति स्थापित हातें.
हृदयाचे बोल. बहुमोल, खोल मनांतिल खोल,
ऐकूं दे वाणी, हृदयाची, माझी मज.
माझ्या हृदयींचा, विश्वास, नाचवुं दे विश्वास;
माझ्या हृदयाचे, नाचच ते, परिसूं दे श्रवणांतें,
माझ्या नयनांच्या, किरणांनीं, मदहृदया पाजळुनी,
लावुनि निज हातीं, दे, दे ती, स्वयंप्रकाशा प्रीति.
दिवसांचें तेज, तेज तया, लाजे चित्त म्हणाया;
दिवसाचा घोर अंधार. बसवी झांपड पार !
दिपवी नयनांना, दाखवुनी, अनंत दु:खें नयनीं,
संशय काहूर करि हृदयीं, स्वास्थ्य क्षणभर नाहीं.
आत्मा होऊनिया निभ्रांत, मूर्च्छित होय मनांत,
वारें उष्ण फिरे वणव्यांत, दग्ध मना जाळीत !
तेलच मग ओती, त्यावरतीं, रविप्रभा निज हातीं.
जळफळतें सारें, धगधगुनी, अशांतिच्या वणव्यांनीं,
ये, ये, ये देवी, दे हृदयीं, प्रेमा विकसन बाई !
अनंत दिव्य कणीं, पसरोनी, अनंतत्व दे गगनीं.
फुंकारें आधीं, दूर करी, रविप्रभा ही सारी,
मग ‘ला, ला’ गाणीं, गावोनी, बाहय जगा निजवोनी,
कर अंधाराचा, पाऊस, पाडुनि शांत जगास.
ते सगळे नाद, नि:पात, बुडवुनि सप्त तळांत !
राज्य करीं जगतीं, घेऊन ती, शांतिपताका हातीं.
आतुर गे डोळे, बघण्याला, रूप तुझें अवलीळा
व्योमीं लाल फुटे; तोंच करी, हाकाटी तुजसाठीं,
तुजविण कोण बरें, वारील, बाहय जडाचा खेळ ?
तुजवांचुन कोण, पेटविल, हृदयीं प्रेमविलो.?
बाहुल्यापणाला, तुझ्याविणें, चित्तहि उल्हासानें ?
लाल. पाहोनी. रक्तपताका गगनीं
फोडी हंबरडा, ही अवनी, दु:खित काकमुखांनी
जागा मी झालों, आईच्या त्या प्रेमळ रजनीच्या -
अपूर्ण