मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
स्वर्गाच्या तेजोगर्भीं । ...

कवि बाळें - स्वर्गाच्या तेजोगर्भीं । ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


स्वर्गाच्या तेजोगर्भीं । बाळें तीं तीं खेळत होतीं,
वत्सलता प्रभुरायाची । जोजवी तयां निजहातीं;
झुलवी त्यां पाळणियांत । छायामय मधु रजनी; ती.
मोत्यांचें घालुनि पाणी
स्वर्गंगा त्यांना म्हाणी,
लडिवाळें बाळें तान्हीं,
देवाचीं आवडती तीं - कविबाळें खेळत होतीं ! १

बैसूनि सूर्यकिरणांत । सोन्याच्या कारंजांनीं
कधिं जलदजाल खुलवावें । स्वर्गींय जादुनें त्यांनीं,
कधिं चंद्रकला सजवावी । ज्योत्स्नेचें जाल विणोनी,
शांती करुनी पांवा
कधिं रात्रीं धरावा,
नक्षत्रलोक डुलवावा,
सौंदर्ये उधळित होतीं - बाळें तीं खेळत होतीं ! २

एकदां सडा संध्येचा । शिंपुनी महोत्सव केला,
बनविलें बीन ओढोनी । कोंबळया सूर्यकिरणांला,
तें वाद्य वाजवायाला । बाळांचा मेळा आला;
ते सांध्यगिरी बहुवर्णी,
छायामय त्या निर्झरिणी
टाकिल्या क्षणीं व्यापोनी !
परिसाया देवहि येती ! बाळें तीं खेळत होतीं ! ३

वाद्याचा ये झंकार । एकेक जसा उदयाला
एकेक सृष्टिचें फूल । लागे हो उमलायाला !
निस्तव्ध मूक गगनाला । निमिषांतच मोहर आला.
आनंद गडे - आनंद,
गाण्याचा एकच छंद,
हो चोहिंकडे गोविंद,
ये रंगनाथ संगीतीं, बाळें तीं खेळत होतीं ! ४

परि आला तीव्र विषारी, । हा न कळे कुठचा वारा !
कंपित हो एकाएकीं । कां दिव्य देश हा सारा !
बाळांचे गळले हात, । बीनेच्या तुटल्या तारा !
ती स्वप्नसृष्टि जळाली,
गाण्याचि तार गळाली,
काजळी चढे वरखालीं,
झाली हो माती माती ! बाळें तीं खेळत होतीं ! ५

त्या खोल भूमिगर्तेंत । अंधार खळाळत होते;
मोहाचें जालिम वीष । बेमान करी सकळांतें;
वासूसह तीव्र विपारी । अंधुकता पसरित ये तें.
वाफारा तो लागोनी
तीं दिव्य बालकें तान्हीं
कळमळुनी पंचप्राणीं
कोसळुनी खालीं येतीं ! स्वर्गीय दिव्य बाळें तीं ६

कडकला गगनीं । ढांसळला, भूवर आला !
स्वर्गीय तेज मालवुनी । पाषाण क्षणार्धी झाला !
हा प्रभाव या जगताचा । दोषावें यांत कुणाला ?
स्वर्गाचे ते शॄंमार, ।
प्रेमाचे मौक्तिकहार,
गांठिता जडाचें दार
जड्तनें वेष्टित होतीं ! स्वर्गीय दिव्य बाळें  तीं ! ७

काळाच्या आवर्तांत । भोवंडुनि गिरके घ्यावे,
चांचपतां अंधारांत । ठेंचाळुनि विव्हल व्हावें,
जें जीवित या जगतीचें । तें त्यांस कसें मानावें ?
जीवास आग लागोनी
तळमळती माशावाणी
स्मरुनी ती पूर्वकहाणी
फोडितात टाहो चित्तीं - बाळें तीं खेळत होतीं ! ८

परि त्याच दीर्घ किंकाळ्या । ठरतात जगाचीं गाणीं !
नि:श्वास आंत जे कढती । ती स्फूर्ति लोक हा मानीं,
संतप्त अश्रुमालेला । गणितात कल्पनाश्रेणी !
गौरवितें विश्व कवींना,
जग सर्व डोलवी माना,
परि मुग्ध मधुर आत्म्यांना
त्या काय बोचतें चित्तीं ? बाळें तीं खेळत होतीं ! ९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP