नाकीं डोळीं चित्र बाहुली देवानें केली,
हतदैवानें लिहुन ठेविलें काय परी भालीं !
येउनिया मागून ठेवुनी खांद्यावर हात,
करुणावदनीं धाउन माला मोत्यांची येत.
वाहूं दे ती मंगलमाया अशीच वाहूं दे;
अश्रुपुरानें या वरुणेच्या जग हें न्हाऊं दे.
मिळेल वैभव दिसतिल जगतीं रत्नांच्या राशी;
अश्रु दयामय, मृत्युजगीं या मोल नसे त्यांसी.
मिळतिल कवनें, मिळतिल दुर्मिळ तत्त्वांचे बोल;
दिव्य अश्रुंनो ! तुम्हांपुढें परि ते सगळे फोल.
दिव्य तारका दूर राहिल्या त्या स्वर्लोकांत;
दिव्य अश्रु परि शुद्ध मनाचे त्यांहुनि निभ्रांत.
अमृताचा वर्षाव जगीं जरि केला जलादांनीं
तृषा न जाइल शोकदग्ध या अवनीची त्यांनीं,
प्रतिजीवाला अखिल जगाला. एक सुधा व्हावी,
अंत:करणीं ओतितसे जी दिव्य दया देवी.
गंगायमुना शुद्ध दयामय अश्रूंची जेव्हां,
त्या गंगेच्या पुण्यदर्शनें नर तरतिल तेव्हां.
परजीवास्तव जेथ आंतडें कळवळुनीं येई,
त्या हृदयाविण स्वर्ग दुजा या ब्रम्हांडीं नाहीं.
स्वर्ग हवा का ? देव हवा का ? ये तर मग येथ;
मलूल अपुलें बनव गडया, या बोलसम चित्त.
राजस बाळा बाळ मंजुळा दौलतरावांची
पोर पोरकी एक राहिली थकल्या जीवाची.
बरोबरीचे पुत्र लाडके जीवाहुनि फार
एकामागुनि एक लोपले समरीं रणशूर.
तुटे तटतटा हृदय लागला जीवावर घाय;
झुरून पांजर माय तयांची त्यांमागुनि जाय.
दुर्धर दु:खें देह खचाया काळमुखीं लागे;
एकच दुबळा पाश ओढितो त्यास पुन्हां मागें.
परलोकींचें स्वप्न मनाच्या नयनावर येतें;
जागेपणचें चित्र मंजुळा परि उघडी येथें !
अखंड चिंताव्यवधानांच्या जीव बुडे डोहीं,
डोळ्यांपुढची बाळ मंजुळा परि हालत नाहीं.
तीव्र विषारी रोग पोखरी आंतुन वृक्षाला.
बाळ - कळीला सहज ज्यामुळें म्लानपणा आला,
दु:ख रेखितें सान जिवावर जी करुना कांहीं,
काव्यलेखनीं चित्रदर्शनीं ती दिसणें नाहीं.
भोळा हृदयीं भाव दाटला. वाही देवाला;
मूकरोदनीं अभागिनीचा नच लागे डोळा.
जीर्ण पसरले हात, उराशीं धरिलें तनयेलाअ;
डोकीवरुनी कुरवाळित कर पाठीवर नेला.
थिजली आशा, जीव गोठल्या नयनांतुनि पाही;
शून्य भविष्यें विकल चेतना करुणाकुल होई.
सरली माया, लोचन मिटले, शांतपणा आला;
एकच झटका क्षीण कलेवर गळलें भूमीला.
नश्वर जग हें, नश्वर अमुचे मायेचे पाश,
क्षणीं तोडुनी काळ तटतटा फेंकुनि दे त्यांस
वैभव गेलें, नांव निमालें, बुडलें घरदार:
फिरला नांगर ओस जाहला भरला संसार.
स्वप्नमात्र हा क्षणिक पसारा, मायेचा भास;
सत्य बोल हे परिन शांतता देतिल जीवास.
अनाथ बाला पोर मंजुळा केवळ अज्ञान,
भूमि फाटली तिला वाटलें तुटलें अस्मान !
धार लागली जी ममते च्या रुधिराची जीवा,
मायेचें जग ओस कुणाला दाविल ती देवा.
कालवतें ब्रम्हांड मनीं, घर खायाला येतें,
निजेल कैसी पोर मंजुळा कुणि सांगा येथें ?