कवीचें स्वप्न - झोंप येते निद्रिस्त विश्व...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
झोंप येते निद्रिस्त विश्व होतें,
झोंप येतां कविचित्तही निजे तें;
किती स्वप्नें तरि व्यक्तिमात्र पाही,
तशीं स्वप्नें पडतात कवीलाही. १
त्रुटित माला या भंगुरा जगाची
व्यक्तिमात्रा स्वप्नांत दिसे साची;
परी ब्रम्हांडें करिल एक ठायीं
स्वप्न असलें कविराय दिव्य पाही. २
विश्वमोहीं दिव्यांश मूढ होतां
अविद्येची स्वप्नांत बघे गाथा;
दिव्य चैतन्यें धुंद दिसा दाही
स्वप्न कविचें प्रज्वलित तेथ होई. ३
ईश्वराचें सद्रूप लुप्त झालें,
कविस्फूर्तीनें मूर्त तया केलें;
जगा नाहीं सामर्थ्य पटायाचें,
म्हणुनि बोले ते स्वप्न हें कवीचें. ४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP