मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
शीतल हें जग झालें - उष्ण ...

शीतल जग - शीतल हें जग झालें - उष्ण ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


शीतल हें जग झालें - उष्ण निमालें, ताप गळाले.
शीतल हा विधु शीतकरांनीं
तप्त जगाला प्रेमें न्हाणी.
शीतल कुंजीं शीतल रजनी
मंजुळ गाणें बोले ? “उष्ण निमालें. प्रेम उदेलें.”

सरल्या तापद दु:खद चिंता,
मन्मन झालें शीतल आतां,
शीतल हें नभ, शीतल वसुधा,
शीतल विश्वच झालें - शांतीचें साम्राज्य उदेलेंं,

शांत तरू हे - शांतच कानन,
झुळझुळ त्यांतुनि निर्झरगायन,
भारित आहे प्रेमरसें मन,
हृदय कीं हें बोले - वनदेवीचें होऊनि ओलें.

रम्य धुकें या वातावरणीं
हंसतें केवळ चंद्रकरांनीं,
कीं नभ भरलें कर्पुरचूर्णीं
हें दंव गे वनमाले - घे नव मोत्यें वेंचुनि बाळे.

चातक गातो मंजुळ गीतां
गा ! तूंही मत्प्रेमळ चित्ता !
परमानंदीं डोलत आतां
मानसा, हर्ष करी रे ! शीतल हें सगळें झालें.


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP