तुझे रुप नेत्री पाहता ध्यान लागले रे ॥धृ॥
युगे अठ्ठावीस उभा विटेवरी पुंडलिकासाठी बससी अजूनी भीमातीरी । भावभक्ति पाहूनी ज्याची त्यासी उद्धरी रे ॥१॥
समचरण सुंदर कासे पिवळा पिंताबर । कर ठेवोनिया करी उभा राहे विश्वंभर । रुप सावळे ते माझ्या नयनी साठले रे ॥२॥
भाळी कस्तुरीचा टिळा तुळशी हार शोभे गळा तुरा तुळशीचा शोभे बुक्का वाहु घननीळा । लिंबलोण उतरु माझ्या सावळा विठ्ठला ॥३॥
जनाबाई सखूबाई उद्धरीली बहिणाबाई ज्ञानदेव चोखामेळा उद्धरीला तुक्याही चरणी ठाव देई तुझीया याच पामरा रे ॥४॥