चला चला गौळणींनो मथुरेच्या बाजारा । दही दुध घेऊ या नंदाच्या कान्हा, मुखी गोरस त्याच्या देऊं या ॥ पहिली गौळण रंगलाल नेसली चुंदडी लाल । मुखी विडी तो रंगला जसे डाळिंबाचे फूल । भाळी कुंकू तिच्या लावूं या कौतुके तिजला पाहुं या ॥१॥
दुसरी गौळण भोळी भाळी रंग हळदीहून पिवळा, पिवळा पैठण नेसून आली अंगी बुट्ट्याची चोळी । वेणी चाफ्याची घालू या कौतुक तिजला पाहुं या ॥२॥
तिसरी गौळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत । गगनी चांदणे लखलखीत वरुन चंद्राचा हात रास क्रीडाती पाहूं या । तिच्यात रंगूनी जाऊयां ॥३॥
चवथी गवळण रंग काळा नेसली चंद्रकळा । काळे काजळ लेवूनी डोळा आली राजस बाळा । गाली तिच्या तीट लावू या कौतुक तिजला पाहुया ॥४॥
पाचवी गौळण हिरवा रंग अवघे झाले दंग, फुगडी खेळते कृष्ण संग अवघा भरला रंग । विठ्ठल विठ्ठल गाऊं या नामांत रंगूनी जाऊं या ॥५॥