आळ का घेता माझ्यावरी । नाही नाही केली विठूची चोरी ॥धृ॥
रात्री माझ्या मन्दिरी आला । माझ्या संगे पळू लागला ॥
माळा पदक विसरूनी गेला हरी ॥१॥
पाहाट झाली बडवे आले । काकड आरती करू लागले ॥
जनीची वाकड प्रभू पांघरले । विस्मीत झाले अंतरी ॥२॥
अपराधी धरूनिया जनिला । चन्द्रभागे तीरी सूळ रोविला ॥
म्हणती चढवा सुळावरी ॥३॥
काळ्या कपट्या कळले अन्तर । वृथा आळ आणिलास मजवर ॥
भक्ती माझी भोळी खरी ॥४॥
चमत्कार श्रीहरीने केला क्षणांत पल्लव फुटती सुळाला जनी सुखाने अंतरी ॥५॥