तुझ्या मुरलीच्या ध्वनी अकस्मीत पडला कानी । विव्हल झाले अंत:करणी ।
मी घर धंदा विसरले ॥ अहा रे सावरिया कैसी वाजविली मुरली ॥धृ॥१॥
मुरली नी हे केवळ बाण रे तिने हरिले माझे प्राण रे ।
केला संसार दाणादाण रे । येऊनी हृदयी संचरली ॥२॥
तुझ्या मुरलीचे स्वर ताण रे मी विसरले देह भान रे ।
घर सोडूनी धरीले रान रे मी वृंदावनी पातले ॥३॥
एका जनार्दनी गोविंदा । पतित पावन परमानंदा ।
तुझ्या नामाचा मज धंदा वृत्ती तव पदी निमाली ॥ अहा रे सावरीया ॥४॥