श्री रामाचीं पदें - पदे ४१ ते ५०
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद ४१ वें
सुदिन हाचि मज वाटे धन्य धन्य बहु जन्म उपार्जित पुण्य पदरिं तेणें, राघव चरण आजि देखिले नयनी ॥धृ०॥
झग झगित मुकुत शिरीं कुंडलें कानीं । लख लख होति गळां माळ वैजयंति । सांवळा सुंदर ऐसा नाहिं त्रिभुवनी ॥सु०॥१॥
रत्न जडित सिंहासनीं श्रीरामधनी । भासे कोटि दिनमणी उदय चाप पाणी । वामजानुवरी सीता जनक नंदिनी ॥सु०॥२॥
राम विष्णु पद कमलीं । कृष्ण अलि तेवि करुनी । शिर नम्र मारुति प्रेमें भक्तिसुख सेवि दिन रजनीं ॥सु०॥३॥
पद ४२ वें
रामीं रमवुं मना नाहीं सार ज्या विना ॥धृ०॥
विषयिं न कांहीं सौख्य समजतां रे । किति भुलूं स्त्री सुत धना ॥रा०॥१॥
नरतनु दुर्लभ अनुकूल असतां रे । वेगें साधूं आत्म साधना ॥रा०॥२॥
विष्णु गुरु कृपा कृष्ण विवरितां रे । पावे आंगें सुखसदना ॥रा०॥३॥
पद ४३ वें
धियाके चित्स्वधन नित्य विचारें जन श्रीरामीं रंगारे ॥धृ०॥
साधिं साधिं आत्मता सोहं प्रियें । सांडुनि कलित विषय संगा रे । न दीन व्हारे स्वसुखें डोलें उमजुनियां निज अंगा रे । ॥धि०॥१॥
नाधि व्याधि विवरितां स्वरुप स्वयें । सहजें जाति त्रिताप भंगा रे । कधीं न बारे दुर्दैवें पोळे सेविम अमृत चिद्नंगारे ॥धि०॥२॥
विष्णु गुरु पदाब्ज मिळतां अद्वयें । कृष्ण भ्रमर गुंगारे । अधीक थोर चिन्मधु मोलें नुरवुनि मीपण चंगारे ॥धि०॥३॥
पद ४४ वें
नांदवि त्रिभुवन जो जगजीवन । पतितपावन दशमुख कंदन ॥धृ०॥
मति वरि पसरा देव न दुसरा । ह्लदयिं न विसरा श्री रघुनंदन ॥नां०॥१॥
सज्जन पालक ब्रह्मांड चालक । श्री राघव एक हरि भव बंधन ॥ना०॥२॥
विष्णु गुरू तोच श्रीराम रुचतो । कृष्ण जगन्नाथ सुखरुप करि वंदन ॥नां०॥३॥
पद ४५ वें
नव नव सुख जिवलग रामीं रमतां । फिरतां संसारीं मन स्थिरता न कधिं वाटे ॥धृ०॥
मानितां सुख विषय दु:ख बहु विध होय । मुखचि न पाहूं यांचें लागती अंगासि कांटे ॥न०॥१॥
सांडुनि देह मीपण असतां एक आपण । सहज सांपडे खुण आनंदें आनंद दाटे ॥न०॥२॥
सदय विष्णु गुरु चरण ह्लदयिं धरुं । कृष्ण जगन्नाथ चाले ऐश्या या सुगम वाटे ॥न०॥३॥
पद ४६ वें
जिवलग राम पाहुं या चला । देह अयोध्येमाजी ह्लदयस्थानीं प्रगटला ॥धृ०॥
दों दिवसांचें भाग्य न साचें । नाम वाचे उच्चारुनि पाउल ऊचला ॥जि०॥१॥
द्वैत भावना जेथ शिरेना । पूर्ण ब्रह्मानंदरूप अद्वय संचला ॥जि०॥२॥
विष्णुगुरु कृपा अक्षय रूपा विवरितां कृष्ण जगन्नाथ हा वांचला ॥जि०॥३॥
पद ४७ वें
श्रीराम नाम गाउं सुखासाठीं ॥धृ०॥
धरुनि संसार पोटीं वदतां विषया गोष्टि । काय लाभ हो शेवतिं उमजा मनासी ॥श्री०॥१॥
करितां प्रपंच र्हाटी वय जाय आटाआटीं । काळ लागलासे पाठीं न कळतां ग्रासी ॥श्री०॥२॥
वैष्णव सद्नुरु भेटी नुरवुनि दु:खें कोटी । कृष्ण जगन्नाथ घोंटी स्वरुपानंदासी ॥श्री०॥३॥
पद ४८ वें
उमज मनीं रामचि जग हें रामचि जग न धरिं कांहिं उबग । कीं रज्जु भुजग जेविं कनक नग ॥धृ०॥
दृष्य पसारा द्रष्टा सारा । सूर्यकिरण मृगजल जैं झगझग ॥उ०॥१॥
अद्वय आपण हे विवरीं खुण । ज्यापरि जलतरंग तेविं अनुभविं मग ॥उ०॥२॥
विष्णुगुरु चरणिं कृष्ण जगन्नाथ सहज । सुखाचा ढीग होय जाय तग मग ॥उ०॥३॥
पद ४९ वें
केवल माझा प्राणसखा रघुवीर । ज्याविण एक क्षणही न धरवे धीर ॥के०॥धृ०॥
इष्टमित्र सुह्लदात्पहि जिवलग, वाटति न जाणत्या जना । ऋणानुबंधें गांठी स्त्रीपुत्रांची, काय मोहुं या देहादिका धना, कळला प्रपंच मिथ्यामय मृगनीर ॥के०॥१॥
मन पवनाचा संग सुटूनी, एकांति मीपणा विना । आपण आनंदमय अद्वय, अखंड भोगितां न उरे वासना, सर्वात्मत्वें नटला गुण गंभीर ॥के०॥२॥
विष्णु गुरुपद प्रसाद ज्यावरी, त्याला जन्म ना पुन्हां । श्रीराम भक्ती निज आत्मैक्यें घडतां, समुळीं विवरे द्वैत भावना, अनुभव कृष्ण जगन्नाथाचा स्थीर ॥के०॥३॥
पद ५० वें
श्रीराम देव एक दुजा नाहीं । मनन करुनिं मागें परतोनि पाहीं ॥धृ०॥
एक अनेकीं अनेक एकीं । आपुला आपण खोटें मीपण न साहीं ॥श्री०॥१॥
सांडुनि वृत्ती होयीं निवृत्तीं । सुखमय होय जेथें आठवेना कांहीं ॥श्री०॥२॥
विष्णु गुरुकृपा आनंदरूपा । कृष्ण जगन्नाथ भ्रम नुरवि ते ठायीं ॥श्री०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP